Fraud : राहाता : शिर्डी परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारातून फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी अशोक खरात (Ashok Kharat) व त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
व्याजाच्या नावाखाली १ कोटी ६४ लाखाला फसवले
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात जमीन व्यवहार करत असताना अशोक खरात याने ३ कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगून दरमहा दोन टक्के व्याजाने रक्कम दिली. त्यानंतर आणखी २ कोटी ५२ लाख रुपये देण्यात आले. या व्यवहारातून संशयित आरोपींनी व्याजाच्या नावाखाली १ कोटी ६४ लाख रुपये किरण सोनवने, अरविंद बावके आणि अशोक तांबे यांच्या मार्फत घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ (Fraud)
फिर्यादीने व्याजाची रक्कम परत केल्यानंतर उर्वरित रकमेचा हिशोब करून जमीन पुन्हा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि अरविंद बावके यानी टाळाटाळ करत व्यवहार पूर्ण केला नाही. यामध्ये ४ एकर जमीन स्वतःच्या नावावर करून न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीने विश्वासाने सही केलेले चेकबुक किरण सोनवने याच्याकडे दिले असता त्याचा गैरवापर करून खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
संशयित आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी अशोक एकनाथ खरात (रा. नाशिक), कल्पना अशोक खरात (रा. नाशिक), किरण नानासाहेब सोनवने (रा. निमगाव, ता. राहाता), अरविंद पांडुरंग बावके (रा. साकुरी, ता. राहाता) आणि अशोक परभत तांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित आरोपी सोनवने आणि बावके या दोघांना अटक करण्यात आली असून बाकी संशयित आरोपींचा शोध शिर्डी पोलीस घेत आहेत. जमीन व्यवहारातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमुळे शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



