Fraud : अन्न भेसळच्या तोतया पथकाचा दूध डेअरीवाल्यांना गंडा

Fraud : अन्न भेसळच्या तोतया पथकाचा दूध डेअरीवाल्यांना गंडा

0
Fraud : अन्न भेसळच्या तोतया पथकाचा दूध डेअरीवाल्यांना गंडा
Fraud : अन्न भेसळच्या तोतया पथकाचा दूध डेअरीवाल्यांना गंडा

Fraud : श्रीरामपूर : अन्न भेसळ प्रतिबंध विभागाचे (Food Adulteration Prevention Department) अधिकारी आहोत, अशी बतावणी (Fraud) करत तोतया पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील एका दूध डेअरीची झडती घेत डेअरीतील दुधाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले. तसेच भेसळीयुक्त दुधावर कारवाई करण्याची भिती दाखवून दूध डेअरी चालकाकडून ४० हजार रुपये उकळले. याप्रकरणी दूध डेअरी चालक यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला’- देवेंद्र फडणवीस

अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची माहिती

दरम्यान या आरोपींनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची माहिती मिळत आहे. याबाबत योगेश फकीरचंद देवकर (वय ३६, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझे अशोकनगर चौक येथे भैरवनाथ दूध संकलन केंद्र या नावाची दूध डेअरी आहे. २४ नोव्हेंबर रोजी एका वाहनातून चार लोक आले व त्यांनी स्वतःची ओळख फुड अॅण्ड ड्रग्स ऑफीसर अशी करून दिली. तसेच त्यातील एकाने त्याचे ओळखपत्र दाखविले व कासारे असे नाव सांगितले. सर्वांनी मिळून माझ्या डेअरीची झडती घेतली तसेच डेअरीतील दुधाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले. तसेच डेअरीत त्यांना काही एक आक्षेपार्ह मिळाले नाही. तेव्हा अंगाने सडपातळ बांधा असणाऱ्या व्यक्तीने बाजूचे कृषि सेवा केंद्रातील सांडलेल्या खत भरुन ठेवलेली पिशवी डेअरीत आणून ठेवली व त्याचा फोटो तसेच व्हिडीओ काढला. त्यानंतर ते चारही जण माझ्याकडे कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी करू लागले. सुरवातीला त्यांनी मला कारवाईची भिती दाखवून पाच लाख रुपयांची मागणी केली. परंतु माझ्याकडे एवढे पैसे नसल्याने मी त्यांना नकार दिला. त्यानंतर त्यांनी मला तुझ्या डेअरीतील दुधाचे सॅम्पल आमचेकडे असून तुझ्यावर भेसळीची केस करू, तुला तीन महिने जामिन होणार नाही, अशी धमकी दिली. त्यामु‌ळे मी घाबरलो व पैसे कमी करण्याची विनंती करू लागलो. तेव्हा त्यांनी माझ्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली, पंरतु माझ्याकडे एवढे पैसे नसल्याने मी त्यांना ४० हजार रुपये  दिले. तेव्हा ते तेथून निघून गेले.

अवश्य वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी

संशय आल्याने दोन इसमांना पकडून नेले पोलीस ठाण्यात (Fraud)

तसेच यादरम्यान यातील एकाने मला त्यांचा मोबाईल क्रमांक देवून स्वतःचे नाव साठे असे सांगितले होते. त्यानंतर मला अशोकनगर येथील डेअरी मालक पोपट बिलास जायभाये यांचेही ५० हजार रुपये व सुमित रमेश पटारे (रा. कारेगाव) यांचेही ६८ हजार रुपये अशाच प्रकारे कारवाईची भिती दाखवून या लोकांनी घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सदर बाबत चर्चा झाल्याने त्याची माहिती मालुंजा या गावातील डेअरी चालक रवींद्र विठ्ठल बोरुडे यांनाही मिळाली होती. बुधवारी (ता.४) मालुंजा गावातील डेअरी चालक रविंद्र बोरुडे यांचे डेअरीवर दत्तात्रय वसंतराव साठे व इतर चार अनोळखी इसम यांनी अशाच प्रकारे तोतयेगिरी करून कारवाईची भीती दाखवून पैशाची मागणी केली असता त्यांना संशय आल्याने त्यांनी यातील दोन इसमांना पकडून बेलापूर पोलीस ठाण्यात नेले. म्हणून मी बेलापूर चौकी येथे जावून पाहणी केली असता पोलिसांचे ताब्यात असलेल्या इसमांना मी ओळखले. दत्तात्रय वसंतराव साठे (वय ३८, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर), अरूण दादासाहेब खुळे (वय ३७, रा. वळण, ता. राहूरी) अशी त्यांची नावे असल्याचे चौकशीत कळाले. याप्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.