प्रल्हाद एडके, नगर
Ganeshotsav : नगर : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. बाप्पाच्या आगमनाचा उत्साह नगर शहरासह (Nagar City) जिल्हाभरात बघायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर नगर शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. नगर शहरात प्रोफेसर चौक, कापड बाजार, चितळे रोड, माळीवाडा, कल्याण रोड, सावेडी, भिस्तबाग चौक, एकविरा चौक आदी ठिकाणी गणेश मुर्ती तसेच सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाजारपेठा (Market) भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठीही भक्तांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर फुलांना तसेच गणपतीची आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांना मोठी मागणी आहे.
अवश्य वाचा: लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका; गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका
साहित्य खरेदी आजचा शेवटचा दिवस
गणेशोत्सवासाठी विविध सजावटीचे साहित्य खरेदी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. तसेच घरोघरी गणरायाची स्थापना होत असल्याने खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. या ठिकाणी घरगुती स्थापनेसाठी २०० रुपयांपासून ते २००० रुपयापर्यंत किंमतीचे गणपती उपलब्ध आहेत.
नक्की वाचा: ‘जो हिंदू हित की बात करेगा,वही देश पर राज करेगा’;’धर्मवीर-२’चा नवा ट्रेलर प्रदर्शित
सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी (Ganeshotsav)
तसेच विविध किमतीचे मखर व सजावटीचे साहित्य उपलब्ध आहेत. तसेच सार्वजनिक मंडळासाठी मोठ्या आकाराच्या गणेश मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गणरायाच्या आगमनानिमित्त आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मखर सजावट, पानाफुलांच्या माळा, विद्युत रोषणाई अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे तोरण ग्राहक विकत घेत आहेत. याशिवाय लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि हिरव्या वेलीसारख्या माळा ग्राहकांकडून खरेदी केल्या जात आहेत.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी शाडू मूर्तीच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीची खरेदी होत असल्यामुळे लोकांना घरीच गणपतीचे विसर्जन करता येणार आहे. तसेच यावेळी पूजा साहित्य खरेदीला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूजा साहित्याबरोबर आरती संग्रह व इतर साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.