Ganeshotsav : कर्जत : कर्जत शहर आणि तालुक्यात मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पास निरोप देण्यात आला. यावेळी तरुणांचा जोश वाखाणण्याजोगा होता. सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांनी वाजत-गाजत गणरायास “पुढच्या वर्षी लवकर या” जयघोषात मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला.
नक्की वाचा: ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके
विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल
कर्जत शहरातील सर्वच प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळानी श्री ची प्रतिष्ठापना केली होती. मागील दहा दिवसांपासून मोठ्या भक्ती-भावाने गणरायाची आराधना, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल, होम मिनिस्टर स्पर्धा, यासह संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली होती. शालेय गणपती विसर्जन मिरवणुकीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक, झांजपथक, लेझीम पथक विशेष आकर्षण होते. तर सार्वजनिक गणेश मंडळाने पारंपारिक वाद्य, ढोल ताशा, हलगी, संबळ आणि डीजेच्या तालावर श्री गणरायास “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत निरोप देण्यात आला.
अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार
चिमुकल्यांना अश्रू झाले अनावर (Ganeshotsav)
रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती मुलूक, सहायक पोलीस निरीक्षक रमीज मुलानी, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओसावे, प्रदीप बोराडे, होमगार्ड विभागाचे मुन्ना पठाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दहा दिवसांपासून घरात लाडक्या गणरायाच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्याची लगबग सुरू होती. यावेळी अनेक चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले होते. गणपती बाप्पा मोरया…. ‘पुढची वर्षी लवकर या’ च्या जयघोषात त्यांनी गणरायास निरोप दिला.