Ganpati : कर्जत : मागील तीन वर्षांपासून कर्जतच्या सौ. सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्यालयात लाडक्या गणरायाची (Ganpati) स्थापना मूर्तीने न करता ती झाडाच्या खोडावर सुंदर अशी गणेशमूर्ती (Ganesh Statue) साकारत केली जाते. विशेष म्हणजे ती साकारताना जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात येतो. त्या खाली पर्यावरण संवर्धनाचा (Environmental Conservation) संदेश विद्यार्थ्यांना दिला जातो.
नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी
लिंबाच्या झाडावरच साकारला गणराया
कर्जतच्या सोनमाळी कन्या विद्यामंदिरात तीन वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करताना एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवात प्रत्यक्ष प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता शाळेच्या परिसरातील लिंबाच्या झाडावरच कलाशिक्षक गणराय साकारतात. यात कला आणि निसर्गाचा मिलाफ घडवत मूर्तीचे साहित्य आणि तिचा पर्यावरणाशी किती जवळचा संबंध आहे हे लक्षात येते. मूर्तीचा मुख्य भाग म्हणजे झाडाचे खोड. त्यावर पुठ्ठा, कापड, कागद, पाने आणि फुले वापरून गणपतीला एक सुंदर रूप देण्यात आले आहे.
आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद
पर्यावरणाची देवता म्हणून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित (Ganpati)
गणपतीच्या डोक्यावर लाल रंगाचा फेटा आणि धोतर म्हणून पिवळ्या रंगाचे कापड वापरले आहे. जे गणरायास एक आकर्षक स्वरूप देते. गणपतीच्या कानांसाठी बांबूच्या सुपांचा वापर केला असून, त्यावर ‘ॐ’ हे धार्मिक चिन्ह काढलेले आहे. लाल फुलांच्या माळेने मूर्तीला अधिकच शोभा आली. ‘देव दगडात नसतो तर झाडात असतो’ या वाक्यातून पर्यावरणाची देवता म्हणून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. खरे देवत्व हे निसर्गात आहे आणि त्याचे रक्षण करणे हेच मानवाचे कर्तव्य आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ मूर्ती स्थापन करणे नसून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. प्रदूषण रोखण्यासाठी अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा संदेश विद्यालयाचे माजी शिक्षक आशिष निंबोरे यांच्या संकल्पनेतून, कला शिक्षिका रुपाली जगदाळे, संजय लांडघुले, प्रवीण काळे आणि इतर सहकारी शिक्षक व मुख्याध्यापिका मेहजबीन पठाण यांच्या मार्गदर्शनातून दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरणाविषयीची जाणीव निर्माण होण्यास मदत होते.