Girls Safety : अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात (Government Polytechnic College) काल (ता. १५) एका शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मुली सुरक्षित (Girls Safety) आहेत का? या प्रश्नाने प्रत्येक पालकाच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. अल्पवयीन मुलीच्या इज्जतीवर हात टाकण्यापूर्वी त्याने नोकरी, कुटुंब व आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात (Maharashtra) राहत आहोत. याचे भान सोडले. अशा प्रवृत्ती एका दिवसात तयार होत नाहीत. हा आरोपी सराईत का झाला याचा शोधही पोलिसांना घ्यावा लागेल.
अवश्य वाचा : श्रीरामपूर काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती कमळ; मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश
मुलींना बोलावून त्यांना कारवाईची भीती दाखवत विनयभंग
या शिक्षकेतर कर्मचाऱ्याविरोधात तीन मुलींनी आतापर्यंत फिर्याद दिली आहे. मुलींना बोलावून त्यांना कारवाईची भीती दाखवत विनयभंग करण्याचा प्रकार करेपर्यंत महाविद्यालय प्रशासन काय करत होते? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. या शिक्षकेतर कर्मचाऱ्याला महाविद्यालयातून कोणाचे पाठबळ आहे का? आणि कशासाठी पाठबळ दिले जात असावे यावर जिल्हाभर चर्चा सुरू आहे. या महाविद्यालयात मुलांचे व मुलींचे असे स्वतंत्र वसतीगृहे आहेत. मुलींच्या वसतीगृहाजवळच संबंधीत शिक्षकेतर कर्मचाऱ्याची लॅब आहे. राज्यभरातून सर्वात हुशार विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतात. त्यांचे पालक मोठ्या विश्वासाने महाविद्यालय प्रशासनाकडे आपले पाल्य सोपवितात. मात्र, येथे अशा पद्धतीने विद्यार्थिनींचा जीव व घराची अबूच धोक्यात आणण्याचा प्रकार केला जात असेल तर पालकांनी विश्वास ठेवायचा कुणा वर?
नक्की वाचा : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव
कॉपी रॅकेटची चर्चा (Girls Safety)
या महाविद्यालयात एक कॉपीला प्रोत्साहन देणारे रॅकेट चालविले जाते व त्या रॅकेटमध्ये या आरोपी असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची दबक्या आवाजात शहरात चर्चा आहे. विद्यार्थ्यांचे गुण ठरविण्यात म्हणजेच शैक्षणिक भवितव्य ठरविण्यात हा आरोपी बरीच ढवळाढवळ करत असल्याचेही सांगितले जात आहे. या कॉपी रॅकेटमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्याला पाठबळ असावे. त्यामुळेच तो थेट विद्यार्थिनींशी गैरप्रकार करण्यास धजावल्याचे चर्चा आहे.
अखेर त्या विद्यार्थ्याचे वर्ष वाया गेले
मागील वर्षी याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याचा पेपर गहाळ झाला होता. त्यावेळीही आरोपी असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याची चौकशी झाली होती. प्रकरण थेट मुंबईपर्यंत गेले होते. अखेर संबंधित विद्यार्थ्याचे वर्ष वाया गेले. या प्रकरणातही कॉपी रॅकेटचा संबंध असल्याची चर्चा झाली होती. शासकीय महाविद्यालयांतून परीक्षेचे पेपर गहाळ कसे होतात याचा त्याच वेळी शासनाने गांभीर्याने शोध घेतला असता तर या महाविद्यालय प्रशासनाला आजचा दिवस पहावा लागला नसता.
धुळ्यात असतानाही वाचला
आरोपी असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याने केवळ अहिल्यानगरमध्येच प्रताप केले असे नव्हे. त्याने धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असताना बस फोडल्याचाही आरोप झाला होता. सहलीला नेलेल्या विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन बस व चालकावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. त्यावेळी प्रशासनाने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला नाही. त्यामुळे तंत्रनिकेतन प्रशासनाला आजचा दिवस पहावा लागला.
राजकीय नेत्याचा वरदहस्त
आरोपी शिक्षकेतर कर्मचाऱ्याला राजकीय वरदहस्त लाभल्याची चर्चा आहे. त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने निवडणूकही लढवली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा त्याच्यावर वरदहस्त असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थिनींनी पोलिसांत या आरोपी विरोधात फिर्याद दाखल करताच त्याला वाचविण्यासाठी महाविद्यालयातील एक प्राध्यापक धावून गेल्याची चर्चा आहे. या प्राध्यापकावरही एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी कोणालाही न जुमानता विद्यार्थिनींमागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. यात पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांची खमकी भूमिका महत्वाची ठरली. अशा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे कायद्याचे राज्य अबाधित आहे.
निलंबनाचा प्रस्ताव
अहिल्यानगरमध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे पुरेशी शोभा झाल्यावर आता महाविद्यालय प्रशासनाला जाग आली आहे. आरोपी असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तरीही प्रश्न उरतोच एवढी वेळ येण्यापर्यंत महाविद्यालय प्रशासन काय करत होते…