Gram Panchayat : नगर : नगर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रतडगाव ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्य मुक्ता दत्तात्रय मोहिते यांना नुकतेच नगरचे जिल्हाधिकारी (Collector) यांनी रतडगाव ग्रामपंचायतच्या सदस्य पदावरून अपात्र करण्याचा निर्णय घोषित केला.
हेही वाचा : Ration card : शिधापत्रिका हाेणार इतिहास जमा; शासन देणार आता ई-शिधापत्रिका
याबाबत माहिती अशी की, रतडगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी मालकीच्या मिळकतीवर ग्रामपंचायत सदस्य मुक्ता दत्तात्रय मोहिते यांच्या सासू व सासरे शिवाजी मोहिते व हिराबाई मोहिते यांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर अपात्र घोषित करावे, म्हणून रतडगाव येथील नागरिक संपत शिंदे, संदीप वाघोले, भाऊसाहेब चेमटे, राजू जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत सदस्या मुक्ता दत्तात्रय मोहिते यांना अपात्र घोषित करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी अन्वये अर्ज केला होता. या अर्जाची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. सुनावणी दरम्यान गटविकास अधिकारी नगर तसेच ग्रामपंचायत रतडगाव यांनी अहवाल सादर केला होता. त्यात संबंधित ग्रामपंचायत सदस्य मुक्ता मोहिते यांचे सासू व सासरे यांच्या नावाने अतिक्रमण असल्याची बाब निष्पन्न झालेली होती.
अवश्य वाचा : Ahmednagar News Update : नगर शहरातील रस्त्यांसाठी ३३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर
एकत्रित कुटुंबात सून मुलगा व सासू-सासरे राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य मुक्ता मोहिते यांना अपात्र करण्याचा निर्णय जाहीर केला. अर्जदाराच्या वतीने वकील गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना राजेश खळेकर, रोहित बुधवंत, गुरविंदर पंजाबी, अंकिता सुद्रिक, सागर गरजे, धनश्री खेतमाळस, बाळकृष्ण गिते यांनी सहाय्य केले.