Gram Panchayat : नगर : नगर तालुक्यातील देहरे (DEHARE) ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पदांची वारंवार फेरबदल करून लोकशाहीची थट्टा केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच डॉ. दीपक जाधव (Dr. Deepak Jadhav) यांनी केला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन सरपंच आणि तीन उपसरपंचांची निवड करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat) कार्यकाळ केवळ पाच महिने शिल्लक असताना, सत्ताधाऱ्यांनी गावातील प्रलंबित विकासकामांकडे पाठ फिरवून केवळ बोर्डावर नाव लावण्याची स्पर्धा, सुरू केल्याचा आरोप डॉ. जाधव यांनी केला आहे.
नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर
डॉ. जाधव म्हणाले की,
डॉ. जाधव म्हणाले की, जर प्रत्येक महिन्याला सरपंच आणि उपसरपंच बदलत राहिले, तर गावाचा विकास कधी आणि कसा होणार? प्रशासनानेही अशा निवडींना मान्यता देणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. भविष्यात अशी परिस्थिती टाळायची असेल तर दोन निवडींमध्ये किमान सहा महिन्यांचा कालावधी बंधनकारक करावा आणि तसा कायदा करण्यात यावा. अन्यथा, गावपातळीवर घोडेबाजार सुरू होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी निवडणूक आयोगाला यासंबंधी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर
गावाच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष (Gram Panchayat)
गावचा मुख्य रस्ता अद्यापही प्रलंबित आहे, उड्डाणपूल बाधित शेतकऱ्यांना २५ वर्षांपासून मोबदला मिळालेला नाही, गावातील अतिक्रमण, भुयारी मार्ग व जलउदंचन केंद्राचे कनेक्शन प्रलंबित आहे, आठवडे बाजाराच्या अडचणींवर उपाय झालेला नाही. ही सर्व कामे बाजूला ठेवून काही मंडळी फक्त सत्तेचा आणि पदाचा खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावात गेल्या काही दिवसांत जातीय तणाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचाच भाग म्हणून दलित उपसरपंचावर अविश्वास ठराव, दलित मुख्याध्यापकाचे निलंबन, दलित ग्रामसेवकाची बदली, आणि मांगिरबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला विरोध, या घटना घडवून आणल्या गेल्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सध्या गावात सर्व पक्षीय एकत्र सत्ता असल्याने विरोधकच उरलेले नाहीत, आणि त्याचाच गैरफायदा घेत गावातील वातावरण बिघडवले जात आहे, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.