Gram Panchayat : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील सुसरे ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून अनुपस्थित असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता पालवे (Sangita Palve) यांना निवेदन दिले आहे. त्या ग्रामसेवकावर (Gramsevak) तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुरेश उदागे, संदीप उदागे, सतीश पिसोटे यांनी हे निवेदन दिले आहे.
नक्की वाचा : जिल्ह्यात १५ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास मुभा
महत्त्वाच्या कामांचा खोळंबा
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या तरतुदीनुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो, त्याची मुख्यालयात नियमित हजेरी आवश्यक आहे. मात्र, सुसरे येथील ग्रामसेवक गावात येत नसल्याने जन्म-मृत्यू नोंदणी, विविध प्रमाणपत्रे, शासकीय योजनांच्या अर्जांची प्रक्रिया, रस्ते व पाणीपुरवठा प्रस्ताव, ग्रामसभेचे आयोजन अशा महत्त्वाच्या कामांचा मोठा खोळंबा झाला आहे. १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीविषयी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यानंतर ग्रामसेवकाने कार्यालयात येणे पूर्णपणे बंद केले आहे.
अवश्य वाचा : वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
स्वतंत्र ग्रामसेवक नेमण्याची मागणी (Gram Panchayat)
काही ग्रामस्थांना धमकीच्या स्वरूपात वागणूक मिळाल्याचा दावा करत संबंधित संभाषणांचे ध्वनिमुद्रण उपलब्ध असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.सध्या एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे सेवेत विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे सुसरे ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र, नियमित ग्रामसेवक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून कामकाज सुरळीत करावे, संबंधित ग्रामसेवकावर विभागीय चौकशी करून आवश्यक शिस्तभंग कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.निवेदनाची दखल घेतली नाही तर पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



