Groundnut Seeds : नगर : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (National Mission on Edible Oils) (तेलबिया) २०२५ अंतर्गत, उन्हाळी भुईमूग पिकाच्या (Groundnut Seeds) १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अधिकाधिक शेतकरी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी (DAS) अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
भुईमूग पिकासाठी हेक्टरी १५० किलो प्रमाणित बियाणे
या अभियानांतर्गत पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी, उन्हाळी हंगाम २०२५ करिता भुईमूग पिकासाठी हेक्टरी १५० किलो (दर ११४ रुपये प्रतिकिलो) शेंगा प्रमाणित बियाणे, केंद्र शासनाने निवड केलेल्या जिल्ह्यांना १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर व कमाल १ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत हा लाभ देय आहे.
शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांच्या भुईमूगासाठीच्या बॅगांची पॅकिंग २० किंवा ३० किलोची आहे. त्याप्रमाणेच बियाण्यांचे वितरण करण्यात येईल. क्षेत्रानुसार आवश्यक बियाण्यांच्या पॅकिंग साईजनुसार अधिकचे बियाणे परिगणित होत असल्यास, त्यासाठीची रक्कम शेतकऱ्यांना स्वहिस्स्याने भरावी लागणार आहे.
शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी बंधनकारक (Groundnut Seeds)
यासाठी शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधीन राहून ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. बियाण्याचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriL…/AgrilLogin या संकेतस्थळावर ‘प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधी आणि खते’ या बाबींतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.



