नगर : आयपीएल २०२४ च्या (IPL 2024) १७ व्या सामन्यात पंजाब किंग्सने (Panjab Kings) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) ३ गडी राखून पराभव केला. पंजाबसाठी हा विजय खूप खास होता. कारण हातातून गेलेला सामना पंजाबने पुन्हा मिळवला. पंजाबने ७० धावांत ४ विकेट गमावल्या होत्या, मात्र शशांक सिंगने फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. आशुतोषच्या ३१ धावांच्या झंझावाती खेळीमुळे हा सामना बहुतांशी पंजाबच्या बाजूने गेला. मात्र शेवटच्या षटकांत त्याची विकेट पडल्याने सामन्यात पुन्हा एकदा उत्साह वाढला. चौथ्या चेंडूवर शशांकच्या बॅटमधून चौकार आला आणि पंजाबने गुजरातच्या तोंडून विजय हिसकावून घेतला.
नक्की वाचा : अरविंद केजरीवाल यांना दिलासा;मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
गुजरातच्या गोलंदाजांच्या २ षटकात ३४ धावा (GT vs PBKS)
१५ व्या षटकानंतर पंजाब किंग्जची धावसंख्या ५ विकेटवर १३८ होती. राशिद खानने टाकलेल्या १६ व्या षटकात १५ धावा आल्या असल्या तरी त्याने जितेशलाही बाद केले. मोहित शर्माने पुढच्या षटकात फक्त ६ धावा दिल्या, शेवटच्या ३ षटकात ४१ धावा आवश्यक होत्या. गुजरातच्या गोलंदाजांनी पुढच्या २ षटकात ३४ धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात पंजाबला फक्त ७ धावांची गरज होती. शेवटचं षटक ही रोमांच भरले होते. पण एक चेंडू शिल्लक असताना पंजाबने हा सामना ३ विकेट्सने जिंकला.
शेवटच्या षटकात खेळ बदलला (GT vs PBKS)
शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी ७ धावांची गरज होती. गुजरातकडेही शेवटच्या षटकासाठी अनुभवी उमेश यादवचा पर्याय होता, मात्र कर्णधार शुभमन गिलने दर्शन नळकांडेवर विश्वास व्यक्त केला. अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या आशुतोष शर्माला नळकांडेने पहिल्याच चेंडूवर बाद केले, तरी गिलचा निर्णय योग्य आहे, असे वाटले, पण तसे झाले नाही. पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर हरप्रीत ब्रार फलंदाजीला आला. त्यानंतर दर्शनाचा पुढचा चेंडू अंपायरने वाईड घोषित केला. त्यानंतर पाच चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज होती. पुढचा चेंडूही अंपायरने वाईड दिला. पण गुजरातचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा च्या विनंतीवरून कर्णधार गिलने रिव्ह्यू घेतला आणि तो त्याच्या बाजूने गेला.
अवश्य वाचा : ‘संघर्ष योद्धा’ चित्रपटातील ‘मर्द मावळा’ गाणे प्रदर्शित
त्यानंतर ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने १ धाव घेतली आणि आता शशांक सिंग स्ट्राइकवर आला होता, जो वेगवान स्फोटक फलंदाजी करत होता. चौथ्या चेंडूवर शशांकने दमदार चौकार मारला.आता दोन चेंडूत १ धावांची गरज होती आणि ही विजयी धाव बॅटने नाही तर लेग बायद्वारे काढली गेली आणि पंजाबने २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला.