Health Checkup : नगर : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला अहिल्यानगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात एकूण १२१ आरोग्य शिबिरांचे (Health Checkup) आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ७ हजार ४९० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हजारो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.
नक्की वाचा: शेंडी येथील मोटर्स शोरुम फोडून चोरी करणारे गजाआड
४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी व्हावी, यासाठी दि.२१ ऑगस्ट २०१५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिय, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ३३१ रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून २ रक्तदान शिबिरांतून एकूण ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अवश्य वाचा : दारुबंदीसाठी महिलांचा रुद्रावतार; पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा
डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग (Health Checkup)
या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय व तालुकास्तरीय शासकीय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील गणेश मंडळांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नंदकुमार नेहरकर यांचे या उपक्रमास सहाय्य व मार्गदर्शन लाभले.
२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान –
अहिल्यानगर जिल्हा आकडेवारी :
- एकूण आरोग्य शिबिरे : १२१
- एकूण लाभार्थी रुग्ण : ७,४९०
- एकूण पुरुष लाभार्थी : ३,८९०
- एकूण महिला लाभार्थी : २,९८७
- लहान बालक लाभार्थी : ६१३
- संदर्भित रुग्ण : ३३१
- एकूण रक्तदान शिबिरे : २
- एकूण रक्तदाते : ४७
गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळाली असून, तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांनी कळविले.