नगर : देशातील तापमान चांगलेच वाढले आहे. उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यामध्ये अंगातून घामाच्या धारा लागल्या आहेत.अशात आता हवामान खात्याने (Weather Department) देशातील ४ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
नक्की वाचा : पंजाब किंग्जचा दणदणीत विजय;चेन्नईचा ७ विकेट्सने पराभव
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, गुजरातमध्ये मे महिन्यात आणखी पाच ते आठ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातील एप्रिलमधील सरासरी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. हे तापमान १९०१ नंतरचे सर्वाधिक तापमान होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. या काळात वादळांची वारंवारता सरासरीपेक्षा कमी राहिली. त्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतातील तापमान तुलनेने जास्त होते.
अवश्य वाचा : ‘पुष्पा २’मधील पहिलं गाणं रिलीज,अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपची चाहत्यांना भुरळ
कर्नाटकमधील सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट
दरम्यान, कर्नाटकमधील सहा जिल्ह्यांमध्ये उष्णेतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणचे तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील बागलकोट, बेळगावी, धारवाड, गदग, हावेरी आणि कोप्पल या जिल्ह्यांमध्ये १ मे ते ९ मे दरम्यान तापमान ४० ते ४६ अंश सेल्सिअस पर्यंत राहिल, असे हवामान खात्याने सांगितले.