Heatstroke : अहिल्यानगर जिल्ह्यातील तापमानात वाढ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
Heatstroke : अहिल्यानगर जिल्ह्यातील तापमानात वाढ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Heatstroke : अहिल्यानगर जिल्ह्यातील तापमानात वाढ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Heatstroke : नगर : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण व दमट राहील. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यासाठी कोरडे हवामान वर्तविण्यात आले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात (Temperature) काही प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे (Heatstroke) मानवी व प्राण्यांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

हेही वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडीची शेतकरी कन्या शीतल थोरात यांची न्यायाधीशपदी निवड

तत्काळ डॉक्टरांशी संपर्क

उष्माघाताची लक्षणे दिसताच नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १०७७, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकांवर संपर्क करावा. नागरिकांनी तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून ओ.आर.एस., लस्सी, ताक, कैरीचे पन्हे व लिंबू पाण्याचा नियमित वापर करावा. दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री वा टोपीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा. गडद, घट्ट व जाड कपड्यांऐवजी हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवावे.

जाणून घ्या लक्षणे (Heatstroke)

अशक्तपणा, डोकेदुखी व सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेची माहिती मिळवण्यासाठी रेडिओ, टी.व्ही. व वर्तमानपत्रांचा वापर करावा. उन्हात अतिकष्टाची व शारीरिक श्रमाची कामे करू नयेत. कामगारांनी उन्हात काम करताना डोक्यावर पांढरा रुमाल बांधावा. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्याबाबत कामगारांना सूचित करावे.

नक्की पहा : आमदार संग्राम जगताप यांच्या आक्रमक भुमिकेमुळे मिस्कीन मळा परिसरातील पुलाचे काम सुरू

अशी घ्या काळजी (Heatstroke)

कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त काम उरकून घ्यावे व उन्हात काम करताना थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची विशेष काळजी घ्यावी. घरे थंड ठेवण्यासाठी व घरात थेट सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून पडदे, झडपा, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे व ओले कपडे वापरून वेळोवेळी थंड पाण्याने स्नान करावे. उन्हाळ्याच्या काळात शक्यतो स्वयंपाक करणे टाळावे व मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात. दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे. तसेच उच्च प्रथिनयुक्त आहार व शिळे अन्न खाऊ नये.

गुरांना व पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवून वेळेवर पुरेसे पाणी द्यावे. उन्हापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. नागरिकांनी या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही गिते यांनी केले आहे.