Heavy Rain : पाथर्डी: रविवारी रात्री व सोमवारी पहाटे मुसळधार पावसाने पाथर्डी (Pathardi) तालुक्यात कहर केला. शेतजमिनी, घरे, दुकाने, वस्त्या पाण्याखाली गेल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला. पाथर्डी शहर बेटाचे स्वरूप धारण करून पूर्णपणे वेगळे पडले. तालुक्याच्या गर्भगिरी डोंगर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाचे (Heavy Rain) पाणी ओढे–नद्यांतून प्रचंड वेगाने आल्याने संपूर्ण तालुका पुराच्या (Flood) पाण्यात सापडला आहे.
अवश्य वाचा: नगर-पुणे रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
रात्रीपासून पहाटेपर्यंत पाऊस
रात्रीपासून पहाटेपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने नाणी नदी, कोरडगाव, कोळसांगवी, खरमाटवाडी, कारेगाव परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी प्रशासन व नागरिकांच्या मदतीने ७५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पिंपळगाव येथे पुराच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीचा जीव स्थानिकांनी मोठ्या शर्थीने वाचवला. मात्र अनेक जनावरे व गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. अमावास्यानिमित्त मढी येथे मुक्कामी आलेले सुमारे ५०० भाविक पूरपरिस्थितीत अडकले. गावाचा संपर्क सकाळपर्यंत तुटला होता. दुपारी संपर्क सुरू झाल्यानंतर देवस्थान समितीने या भाविकांना जेवणाची सोय केली.
नक्की वाचा : सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही; निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका
पुरा मार्ग बंद (Heavy Rain)
पूरस्थिती गंभीर झाल्याने सोमवारी सकाळी मोहटादेवी गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. घटस्थापनेच्या दिवशी भाविकांनी गडावर न येता घरीच थांबावे, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले. कारेगावचा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नंतर पाण्याचा पूर ओसरल्यानंतर दुपारी चार वाजता मुरमी भरावा टाकून तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग सुरू करण्यात आला. पर्यायी मार्ग म्हणून धायतडकवाडी–डोंगरशिवारातून दीपाली हॉटेलपासून कल्याण–विशाखापट्टणम मार्गाचा वापर नागरिकांनी केला. राष्ट्रीय महामार्ग (कल्याण–विशाखापट्टणम) : येळी–फुंदे टाकळी दरम्यानचा पूल खचल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडले होते. वाहतूक धोकादायक झाली.
महामार्ग प्राधिकरणाने चेतावणी फलके लावली आहे. राज्य महामार्ग (बारामती–छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी–बीड, बीड–मोहटा) सर्व पुलांवरून पाणी वाहिल्याने पूर्णपणे बंद झाले होते. सुसरे–सोमठाणा रोडवरील पूल तुटला, कोरडगाव–बोधेगाव पूल वाहून गेला त्यामुळे येथील वाहतूक बंद आहे. मोहरी–मोहटागड दरम्यानचा पूल वाहून केल्याने येथील परिसरातील देवी भक्तांना मोठी अडचण झाली आहे. गर्भगिरी डोंगर पट्ट्यातील पाण्याने माणिकदौंडी, वृद्धेश्वर, घाटशिरस, मढी, मोहटा, करोडी, चिंचपूर, अकोला, खर्डे, तिनखडी, भिलवडे, जांभळी, दुले चांदगाव, भालगाव, मोहरी आदी परिसरात धुमाकूळ घातला. विशेषता तालुक्यातील पूर्व भागातील सर्वच गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पुरच्या पाण्यात पूर्व भागातील एकही गाव वाचले नाही. सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.
तिनखडी येथील गाढव तलाव फुटल्याने पाणीच पाणी झाले. धायतडकवाडी येथील पाझर तलाव धोकादायक स्थितीत असून खालच्या वस्त्या जलमय होऊन शेतात पाणी गेले. जोगेवाडी, चिंचपूर पांगुळ, मानेवाडी, वडगाव, पिंपळगाव टप्पा या भागातही चांगला पाऊस झाल्याने जनजीवन करीत होऊन सर्व ठप्प झाले होते. पावसाचा या आणीबाणीत काही कंपन्यांची दूरसंचार सेवा बंद पडली होती. कोरडगाव येथील नाणी नदीने रुद्र रूप धारण केले होते. घरे, दुकाने पाण्याखाली गेली. अग्निशमन व बचाव पथकाने मदतकार्य केले. पागोरी पिंपळगाव येथील नागरिकांना दोरी व जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले गेले. येथील जुना पूल वाहून गेला आहे.
कारेगाव येथील तुकाराम दहिफळे यांचे किराणा दुकान पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. चेकेवाडी (माणिकदौंडी घाट) एका व्यक्तीचा विहिरीत पडल्याचे वृत्त पुढे आले आहे. बचाव कार्याच्या पथकाने या ठिकाणची पाहणी केली, मात्र, व्यक्तीचा शोध लागला नाही. पाथर्डी शहरात मुंडे कॉम्प्लेक्स, सर्वच उपनगरात पाणी साचले गेले. गाडगे आमराई, रंगार गल्ली याठिकाणी पाणी शिरले. अनेक घरांच्या भिंती पडल्या. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने गाडगे आमराई परिसरातून दोन नागरिकांना पुरातून बाहेर काढले. आमदार मोनिका राजळे यांनी शहर व तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तातडीच्या मदतीच्या सूचना दिल्या.
केदारेश्वर संस्थेचे संचालक ॲड. प्रताप ढाकणे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. तर भगवान दराडे यांच्या जय मातादी कन्स्ट्रक्शनच्या वतीने कारेगावसह अनेक रस्ते मोकळे केले. तसेच प्रशासनाच्या मदतीने कारेगावचा पुलावरील रस्ता सुरळीत केला. शेतीतील उभी पिके, जनावरे, घरे, दुकाने, पूल, बंधारे, रस्ते या सर्वांचे मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. कोरडगाव सह अनेक ठिकाणच्या नागरिकांनी घरांच्या छतांवर, उंच ठिकाणी आश्रय घेतला. अनेकांनी स्थलांतर केले. नदीकाठच्या वस्त्यांतील नागरिक रात्रभर जागरण करत राहिले.
प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण दहातोंडे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी , पाथर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे हे बचाव कार्यासाठी आपल्या बचाओ पथकाच्या मदतीने मदत करीत होते. पोलीस दलाची रात्रीपासूनच मोठी धावपळ झाली. काही ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पोलीस पथक दाखल होत होते. अनेक ठिकाणचे रस्ते बंद पडले होते ते सुरळीत करण्याचे काम पोलीस दलाने विविध शासकीय विभागांच्या प्रतिनिधींच्या मदतीने केले. मोहटा देवीकडे जाण्यासाठी सर्वच रस्त्यावर पाणी असल्याने भाविकांचे मोठे हाल झाले. घटस्थापनेच्या दिवशी विशेषतः पायी येणाऱ्या देवी भक्तांचे संख्या लक्षणीय असते. अशा भाविकांचेही मोठे हाल झाले. जिल्हा प्रशासनाने अद्यावत असलेल्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेली राज्य आपत्ती बचाव निवारण पथक हे मोहटा देवी गडावर नियुक्त केले आहे.