Heavy Rain : नगर : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेती, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या (Central Government) उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने (Central Team Review Damage) बुधवारी (ता. ५) पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पथकाचे नेतृत्व भारत सरकारच्या सहसचिव आर. के. पांडे यांनी केले. त्यांच्यासोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अरविंद वाघमारे, तसेच गृह मंत्रालयाचे आशिष गौर, उपस्थित होते.
अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन
पथकासोबत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित
पथकासोबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू
पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी (Heavy Rain)
पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी व सोमठाणे खुर्द या गावांना भेट दिली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी पावसाचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकाने संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
तसेच शेतकरी बबनराव दानवे यांच्या संत्रा फळबागेची व पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी पथकाने भविष्यात अशा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर पथकाने देवराई येथील बंधारे व पारेवाडी येथील पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत पथकाने आवश्यक त्या ठिकाणी पुनर्बांधणी करण्याच्या सूचना दिल्या. केंद्रीय पथकाने संपूर्ण पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत नुकसानग्रस्तांना दिलासा देत त्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.



