Heavy Rain : नगर : बंगालच्या उपसागरावर (Bay Of Bengal) एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे, आणि 27 जुलै पर्यंत तो मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात (Marathwada) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे.
नक्की वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड
पूर्व-उत्तर विदर्भात सर्वाधिक पाऊसाची शक्यता
पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता देवदत्तने साधला I❤️नगरशी खास संवाद…
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून इशारा (Heavy Rain)
25-26 जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही; तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात काही प्रमाणात दरड कोसळणे, आणि सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.