Heavy Rain : नगर : अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात पावसाने (Heavy Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांमध्ये झालेल्या ढगफुटी (Cloudburst) सदृश पावसाने पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली आहे. अनेक गावातील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून प्रशासनाकडून बचावकार्याला वेग आला आहे.
नक्की वाचा : मोहटादेवी गडावर नवरात्रात पोलीस बंदोबस्तात वाढ; सोमनाथ घार्गे यांचे आश्वासन
अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली (Heavy Rain)
जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी व जवखेडे येथे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ही गावे पाण्याखाली गेली असून या गावांचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही गावातील सुमारे ७० ते ८० नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना बचाव कार्याद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. करंजी येथे पुरात अडकलेल्या १६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्यापही चार ते पाच लोक पुरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग सहामध्ये इच्छुक उमेदवार लागले तयारीला
प्रांताधिकारी प्रसाद मते, (Heavy Rain)
तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बचाव कार्याचे पथक सध्या करंजीमध्ये सतर्क आहे. करंजी येथील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिराला पुराचा वेढा बसला आहे. या परिसरातील नागरिकांना राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले आहे. या पूरस्थितीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुसळधार पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील बेलपारा धरण ओव्हरफ्लो झाल्याचे पहायला मिळाले.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Heavy Rain)
अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे गावात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी परिसरातील पूल पुराच्या पाण्यामुळे आज पहाटे वाहून गेला आहे. त्यामुळे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांचा अहिल्यानगर शहराकडे येण्याचा संपर्क तुटला आहे. आगडगाव परिसरात आज पहाटे ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे तेथील ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. अरणगाव येथेही सीना नदीला पूर आला आहे. शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील नंदिनी नदीला आला पूर आला आहे. पारनेर, अकोले व नेवासा तालुक्यातही झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून प्रशासनाकडून बचावकार्याला वेग आला आहे.