Heavy Rain : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी (Holiday for Schools) देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश काढले आहेत.
नक्की वाचा : मोहटादेवी गडावर नवरात्रात पोलीस बंदोबस्तात वाढ; सोमनाथ घार्गे यांचे आश्वासन
हवामान खात्याचा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग सहामध्ये इच्छुक उमेदवार लागले तयारीला
१५,१६ सप्टेंबर आवश्यकता असल्यास शाळा बंद (Heavy Rain)
या पार्श्वभूमीवर १५ व १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आवश्यकता असल्यास शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय शालेय व्यवस्थापन समिती घेऊ शकेल. सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. तथापि या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाज करणे बंधनकारक राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.