Vidarbha rain Alert: सध्या देशभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाज खरा ठरताना दिसत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तर,अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे.
नक्की वाचा : खुशखबर!वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ
भंडारा,गोंदिया,चंद्रपुर,गडचिरोलीला पुराचा फटका (Vidarbha Rain Alert)
झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोलीसह आसपासच्या गावांना बसला आहे. तर आज देखील हा पावसाचा जोर कायम राहणार असून आज विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूर वेध शाळेने वर्तवला आहे. संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना ही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यात.
अवश्य वाचा : ‘दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या दरात मिळतील’-नितीन गडकरी
गोंदियात अतिवृष्टीची नोंद (Vidarbha Rain Alert)
गोंदिया जिल्ह्यात काल (ता.९) रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. गोंदियातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यातच गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने या परिसरातील अनेक लोकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची रात्रीपासूनच तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात सुद्धा पाणी आल्याने मूर्तीच्या समोर पाणी साचलेले आहे. अशीच काहीशी परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची आहे. जिल्ह्यात सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून भामरागड येथील पुरामुळे बोटीने रुग्णांना रुग्णालयात आणण्याची वेळ आली आहे.
भंडारा जिल्ह्याला मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यामुळे भंडारा शहरासह ग्रामीण भागातही अनेक भागात जलमय स्थिती निर्माण झालीय. दरम्यान, भंडारा-मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या तुमसर शहरातून जाणारा आंतरराज्य मार्ग हा मुसळधार पावसानं जलमय झाला आहे. तर खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.