
Heavy Rains : नगर: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात २४ मंडलात अतिवृष्टी (Heavy Rains) झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यावर जलसंकट ओढावले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली (Rivers Cross Danger Level) आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली असून असून सर्वत्र पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली आहे.
अवश्य वाचा : मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
ढगफुटीसदृश पावसाने अनेक घरे पाण्याखाली
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अनेक गावांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात झालेल्या तुफान पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्यानगर शहरातील वारुळाचा मारुती रस्ता परिसरात सीना नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. या परिसराचा अहिल्यानगर शहराशी संपर्क तुटला आहे. अरणगावातील मेंढका नदी दुथडी वाहू लागली आहे. त्यामुळे मुदळ वस्तीकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने वस्तीचा संपर्क तुटला आहे.
नक्की वाचा : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना
पुराचे पाणी शिरले थेट गावात (Heavy Rains)
नगर शहराबरोबरच शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, नेवासा तालुक्यातील काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे. गर्भगिरी डोंगररांगात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढोरा, वृद्धा या नद्यांना महापूर येऊन शेवगाव तालुक्यातील शेवगाव-अहिल्यानगर मार्गावरील ढोरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेवगाव येथील नंदिनी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी थेट गावात शिरले आहे.
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण व वाडेगव्हाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. ओढ्यांना पूर आला आहे तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील माती वाहून गेली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील शेतजमिनी जलमय झाल्या असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
नेवासा तालुक्यातील कौठा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी मोठा पाऊस सुरु आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाल्याने नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, कांदा तसेच कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.