Hindutva : नगर जिल्हा हा साम्यवादी (Communist) व समाजवादी चळवळींचा गड राहिला आहे. मात्र, आता या गडाला तडे गेले आहेत. समाजवादी (Socialist) विचार घेऊन चालणारे आणि त्यांच्या वारसांनी हाती हिंदुत्ववादाची (Hindutva) तलवार घेतली आहे. ही तलवार दुधारी आहे.
नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू-मुस्लिम भेदभावाची पहिली ठिणगी
देशाला गणराज्य संकल्पना जुनी होती. मात्र, काळपरत्वे यात राजेशाही व सामंतशाहीने आपले वर्चस्व मिळवले. इंग्रज सत्तेत आल्यावर जनसामान्यांत शिक्षणाची गंगा पोहोचली. त्यातून वैचारिक अधिष्ठान असणाऱ्या सामाजिक व नंतर राजकीय चळवळींनी जन्म घेण्यास सुरुवात केली. देशात काँग्रेसची स्थापना व वाढता प्रतिसाद पाहता मुस्लिम नेत्यांनी ३० डिसेंबर १९०६ मध्ये स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. यातून स्वातंत्र्याच्या राजकारणात हिंदू-मुस्लिम भेदभावाची पहिली ठिणगी पडली. मुस्लिम लीगचे वाढते प्रस्त व त्यांच्या नेत्यांकडून होत असलेली वक्तव्ये पाहून कधी नव्हे ते हिंदुत्ववादी जनता उत्तर भारतात आक्रमक होत होती. यातूनच पंडित मदनमोहन मालवीय यांनी १९१५ मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली. पुढे २७ सप्टेंबर १९२५ मध्ये डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या दोन्ही संघटनांचा महाराष्ट्रात चांगलाच प्रभाव दिसून आला. वि.दा. सावरकर हेही बराच काळ हिंदू महासभेत होते.
अवश्य वाचा : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी
१९८० ला अटलबिहारी वाजपेयींकडून भाजप ची स्थापना (Hindutva)
भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांनी १९५१ मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. हा हिंदुत्ववाद्यांचा पहिला राजकीय पक्ष होता. १९७५ च्या सुमारास काँग्रेसच्या विभाजनानंतर भारतीय जनसंघ व इतर काँग्रेस विरोधी समाजवादी पक्षांनी एकत्र येत जनता दलाची स्थापना केली. या जनता दलात जनसंघ विलीन झाल्याने त्याचे अस्तित्व संपले. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या विजयानंतर जनता दलाचे विभाजन झाले. जनसंघातील नेत्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करण्याचा निर्णय घेतला. ६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयींनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. १९८७ मध्ये विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेने हिंदुत्व हा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे भगवीकरण सुरू केले. शिवसेनेच्या हिंदुत्वाला वाढता प्रतिसाद पाहता भाजपही आक्रमक झाली. २५ सप्टेंबर १९९० रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली. पुढे कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी पाडली. तोपर्यंत दोन्ही पक्ष हे केवळ शहरी भागात अस्तित्व असणारे पक्ष म्हणून ओळखले जात होते. मात्र, हिंदुत्वाने त्यांना ग्रामीण भागातही यश देण्यास सुरुवात केली.

नगर जिल्ह्यात इंग्रज काळापासून विविध चळवळी होत्या. यात आदिवासी चळवळ, कम्युनिस्ट चळवळ, काँग्रेस अशा चळवळी मोठ्या प्रमाणात होत्या. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विरुद्ध कम्युनिस्ट असेच राजकीय सत्तासंघर्ष होत असत. पण त्याच बरोबर तुरळक प्रमाणात मुस्लिम लीग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपले अस्तित्व निर्माण केले. श्रीरामपूर जवळील बेलापूर येथील व्यास कुटुंब, ग.म. मुळे, कोपरगावचे सूर्यभान वहाडणे, नगरमध्ये संघाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्राचे प्रांत दिवंगत माणिकराव पाटील, शेवगावकडे ना.स. फरांदे, संगमनेरमध्ये श्याम जाजू या सारख्या नेत्यांनी जिल्हाभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे विणण्याचे काम केले. ग.म. मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागात मोठे काम उभे करत हिंदुत्व व प्रखर राष्ट्रवादाची चळवळ पोहोचवली. शिवसेना व भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने जिल्ह्यात हे पक्ष वाढू लागले. यातूनच माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी, भीमराव बडदे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, राम शिंदे, नगरमधील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, गंधे कुटुंबीय या सारखे नेतृत्व पुढे येत गेले. तरीही या दोन्ही पक्षांना नगर शहर व कर्जत-जामखेडच्या वर मजल मारता येत नव्हती.
शिवसेना व भाजपला जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढण्याची संधी मिळाली, ती माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानंतर. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी खासदार यशवंतराव गडाख याच्याशी १९९१ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब विखेंचे वितुष्ट वाढले. यातच राजीव गांधींच्या निधनानंतर शरद पवार यांचे काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर वजन वाढले. यातूनच बाळासाहेब विखे पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा राजकीय प्रवेश शिवसेना व भाजपच्या युतीला फायद्याचा ठरला. कधी नव्हे ते नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गडाला युतीने मोठे खिंडार पाडले. तत्कालीन कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव बडदे तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बाळासाहेब विखे पाटील असे कधी नव्हे त्या दोन्ही जागा युतीने जिंकल्या.
शरद पवारांनी काँग्रेसमधून वेगळे होत १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर विखे काँग्रेसमध्ये परत आले. मात्र, विखे कुटुंबाचे भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध तयार झाले. पारनेरमधील भाकपचे माजी आमदार भास्करराव औटी यांचे पूत्र विजय औटी यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव काळे यांचे पूत्र अशोक काळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आणि पारनेर व कोपरगावमध्ये भगवे वादळ आले. मात्र, हे हिंदुत्व कधीही आक्रमक नव्हते.
२०१४ मध्ये मोदींच्या लाटेत युतीने मोठे यश मिळवले. २०१९ मध्ये विखे कुटुंब भाजपमध्ये आले. भाजप व शिवसेनेची युती तुटली. तर भाजपने केलेल्या शिवसेनेच्या विभाजनात विभाजनाच्या खेळीत राधाकृष्ण विखे पाटलांचा हात असल्याच्या चर्चाही रंगल्या. अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतर महायुतीने आक्रमक हिंदुत्ववाद सुरू केला. या आक्रमक हिंदुत्वाला लोकसभा निवडणुकीत अपयश आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत विखेंच्या राजकीय खेळ्या व हिंदुत्ववाद या बळावर महायुतीने मोठे यश मिळवले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्व विरोधात मुस्लिम मते एकत्र येतात हे राजकीय नेत्यांच्या लक्षात आल्यावर जिल्ह्यात कधी नव्हे ते टोकाच्या आक्रमक हिंदुत्ववादाचे दर्शन घडू लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात मुस्लिम समाज एकवटला होता. मुस्लिम समाजाने कधी नव्हे एवढ्या मोठ्या संख्येत मतदान केले. हे मतदान निलेश लंके यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले. तोपर्यंत विखे म्हणजे पक्ष विरहित राजकारण असे समीकरण होते. विखे गटाचे लोक सर्वच पक्षात होते. मात्र, या निवडणुकीत जवळचे म्हणणारेही विखेंच्या विरोधात उभे दिसले. यातच निलेश लंकेंना थोरात गट, भाजपचा नाराज गटानेही साथ दिली. विधानसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हाभर राजकीय खेळ्या सुरू केल्या. खासदार झालेल्या निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके, ४० वर्षे आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरातांचे भाच्चे जावई शंकरराव गडाख, अनुराधा नागवडे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आदींना पराभवाचा धक्का बसला. मात्र, यात चर्चा झाली ती राणी लंके, बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाखांच्या पराभवाची.
आणि हे नेते हिंदुत्ववादी झाले…
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विखेंना माजी मंत्री शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप या सासरे-जावई यांनी सर्वाधिक साथ दिली. या निवडणुकीत मुस्लिम समाज विधानसभेच्या वेळी विरोधात जाऊ शकतो याची त्यांना कल्पना आली अशी चर्चा आहे. त्यामुळे कर्डिले व जगतापांकडून कधी नव्हे ते हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्यात आला. अहिल्यानगर शहरात माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनामुळे हिंदुत्ववादी चेहरा नव्हता. यातच ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहरम मिरवणुकीत मुस्लिम समाजाने आमदार संग्राम जगताप यांना विरोध दर्शवल्याचे बोलले जाते. तरीही आमदार जगताप यांनी मुस्लिम समाजाची तात्पूर्ती नाराजी जाईल या आशेवर काम सुरूच ठेवले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना मुस्लिम समाजाचा विरोध दिसून आला. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जगतापांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पूर्वीपेक्षाही मोठे मताधिक्य मिळाले. मुस्लिम समाज विरोधात जाऊनही यश मिळू शकते. याचा विश्वास आमदार जगताप व त्यांच्या समर्थकांत निर्माण झाला. त्यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. एक वर्षांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी निलेश राणे यांना नगर शहरात विरोध दर्शवला होता. त्याच निलेश राणेंबरोबर जाऊन श्रीगोंद्यातील हिंदू दलितांची भेट घेतली. आमदार संग्राम जगताप यांची बदलेली राजकीय भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी काल (ता.२०) आरटीओ कार्यालयात केलेले आंदोलन असो अथवा मागील महिन्यात सिद्धटेकमध्ये केलेले आंदोलन असो आमदार जगताप हे जिल्ह्यातील हिंदुत्ववाद्यांचा आक्रमक नेता म्हणून पुढे येत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुरी तालुक्यातील उंबरे येथील लव्ह जिहाद प्रकरण घडल्याचा आरोप करत हिंदुत्ववाद्यांनी आक्रमक आंदोलन व मोर्चे काढले होते. उंबरेतील घटनाक्रम हा राहुरी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला. यातच विखे गटाकडून भाजपच्या शिवाजी कर्डिलेंना मदत झाली. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केल्याचे सांगितले जाते. या विजयानंतर भिंगार येथील एका कार्यक्रमात शिवाजी कर्डिले यांनी चक्क भगवा फेटा, भगवी शाल व हातात त्रिशूळ घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता.
संगमनेरमध्ये विधानसभा निवडणूक व तत्पूर्वी झालेल्या घटनांमुळे संगमनेरमध्ये थोरात यांच्या विरोधात हिंदुत्वाची सुप्त लाट होती. ही लाट डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभा व मतदानातून दिसून आली. बाळासाहेब थोरातांचा नवख्या अमोल खताळ यांनी पराभव केला. हा काँग्रेसच्या विचारांचा गड असलेल्या संगमनेरमध्ये हिंदुत्ववादाने केलेला शिरकाव होता. श्रीगोंद्यातही हिंदुत्ववादी आंदोलनांत आमदार विक्रमसिंह पाचपुते दिसत आहेत. श्रीरामपूरमध्ये सागर बेग यांना मिळत असलेला प्रतिसाद, नेवाश्यात आमदार विठ्ठल लंघे यांनी गळ्यात घातलेला भगवा पंचा हे राजकीय चर्चांचे विषय ठरत आहेत.
विठ्ठलराव लंघे यांचे वडील वकीलराव लंघे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते. आणि विठ्ठलराव लंघे हे हिंदुत्वाचे राजकारण करताना दिसत आहेत. अकोल्यातील माजी मंत्री दिवंगत मधुकर पिचड यांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार जनसामान्यात नेला. त्यांचे पूत्र वैभव पिचड मात्र, हिंदुत्ववादाचे राजकारण करत आहेत. माजी आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनीही या पूर्वी कधीही धार्मिक राजकारण केले नव्हते तेही धर्माचा मुद्दा राजकारणात वापरत आहेत. हा जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी आहे. एकवेळ कम्युनिस्टांचा गड असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसने आपले निशान फडकवले होते. मात्र, आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला भाजप व मित्रपक्षांनी खिंडार पाडले आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षांनी राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनीही हिंदुत्वाचा राग आळवण्यास सुरुवात केली आहे. यातून सांगण्यासारखं एवढंच की, साम्यवाद्यांच्या मैदानात हिंदुत्ववाद्यांनी आपला आखाडा तयार केला आहे.