नगर : चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने (HMPV Virus) धुमाकूळ घातल्यानं जगभरात कोरोनासारखी महामारी (pandemic) पुन्हा येते की काय अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झालीय. त्यात भारतात या रोगाचे काही रुग्ण देखील आढळून आलेत. मात्र घाबरून जाऊ नका, कारण एचएमपीव्हीमुळं कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
मात्र आता हा आजार नेमका काय आहे, याची लक्षणे (Symptoms) काय, त्यापासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये (Precautions) या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..
नक्की वाचा : मोठी बातमी! भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण
एचएमपीव्ही म्हणजे ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस. हा एक श्वसन संसर्गजन्य आजार असून तो वरचा आणि खालचा श्वसन मार्ग प्रभावित करतो. हा प्रामुख्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो.पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 90 टक्के लोकांमध्ये एचएमपीव्ही संसर्गाचे पुरावे सापडतात, तर 3 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या 90 टक्के बाळांमध्ये एचएमपीव्ही च्या अँटीबॉडीज आढळतात.
अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी
एचएमपीव्ही व्हायरसची लक्षणे काय ?(HMPV Virus)
एचएमपीव्ही मध्ये ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, श्वसनाला त्रास होणे अशी लक्षणे दिसतात.तर काही प्रकरणांमध्ये संसर्गाचा भाग म्हणून पुरळ देखील येऊ शकतात. थंड हवामानात त्याचा धोका जास्त असतो. खोकला आणि ताप ही या आजाराची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. सुरुवातीला त्याची लक्षणे सामान्य व्हायरससारखीच दिसतात, परंतु जर विषाणूचा प्रभाव गंभीर असेल तर न्यूमोनिया आणि ब्राँकायटिसचा धोका उदभवण्याची शक्यता जास्त असते.
‘एचएमपीव्ही’ व्हायरस कसा पसरतो?(HMPV Virus)
HMPV विषाणू खोकताना आणि शिंकण्याद्वारे पसरतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. संक्रमित व्यक्तीशी हस्तांदोलन करून किंवा विषाणूने संक्रमित झालेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्याने देखील त्याचा प्रसार होऊ शकतो.दाट लोकवस्ती असलेल्या असलेल्या शहरी भागात आणि गर्दीच्या ठिकाणी या विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो. तर संसर्ग झाल्यानंतर तीन ते पाच दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात.आता या व्हायरसपासून वाचण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही खबरदारी घ्यायला सांगितली आहे.
आता ‘या’ व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावे ?
खोकला किंवा शिंका येत असेल तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकून ठेवा.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा.
संसर्ग कमी करण्यासाठी हवा पुरेशी खेळती राहिल अशा वातावरणात राहा.
काय करू नये :
हस्तांदोलन करू नये.
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा.
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये.