नगरकरांसाठी सर्वसुविधांयुक्त रुग्णालयातून आरोग्य सेवा मिळणार, आयुक्त यशवंत डांगे यांनी घेतला कामाचा आढावा
Hospital : अहिल्यानगर : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून (Maharashtra Suvarna Jayanti Nagorothan Yojna) बुरुडगाव रस्त्यावरील महानगरपालिकेच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन अद्ययावत रुग्णालयाच्या (Hospital) इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्यस्थितीत ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामालाही गती देण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी सांगितले.
आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडून कामाची पाहणी
आयुक्त यशवंत डांगे यांनी मंगळवारी या कामाची पाहणी करून आढावा घेतला. चाहुराणा बुद्रुक स.नं.४६/१ या जागेमध्ये अद्यावत रुग्णालय बांधण्यात येत आहे. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी २३.८४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. इमारतीमध्ये तळघर, तळमजला व त्यावर चार मजल्यांची इमारत बांधण्यात येत आहे. तळघरात पार्किंग, तळ मजल्यावर ओपीडी व लॅब, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जनरल वॉर्ड, आयसीयु व ऑपरेशन थिएटर, तिसऱ्या मजल्यावर प्रायव्हेट रूम, डॉक्टर कक्ष, चौथ्या मजल्यावर कॅन्टीन, सेमीनर हॉल, डॉक्टर कक्ष असणार आहे. इमारतीत नागरीक, रुग्णांसाठी २ पॅसेंजर लिफ्ट व १ स्ट्रेचर लिफ्ट असणार आहे.
१०० बेडचे रुग्णालय (Hospital)
१०० बेडचे रुग्णालय असून आरसीसी बांधकाम, प्लॅस्टरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, आतील बाजूने दुसऱ्या मजल्यापर्यंत टाईल्सचे काम पूर्ण झाले आहे. जिन्याच्या ग्रॅनाईटचे संपर्ण बिल्डींगचे काम पूर्ण केले असून, आगप्रतीबांधक उपाययोजनांचे अंतर्गत लाईनचे संपूर्ण मजल्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यापर्यंत प्लंबींगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे.
महानगरपालिकेने या कामापोटी ठेकेदार संस्थेला आत्तापर्यंत १८.८५ कोटींची बिले अदा केली आहेत. इमारतीला संरक्षक भिंत, परिसर सुशोभिरण व मुख्य रस्त्याला जोड रस्ते यासाठी ३.१७ कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठीही कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. नागरी स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे या लेखाशिर्षा अंतर्गत फर्निचर व्यवस्था, डिजीटलायजेशन व आयटी सोल्युशनसह बिल्डींग पूर्ण करण्याकरीता ३.३५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, रुग्णालयाच्या उभारणीनंतर तेथे आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी, इतर वैद्यकीय कर्मचारी, लॅब टेक्निशियन व इतर मनुष्यबळ आऊटसोर्सिंगद्वारे भरण्यात येणार आहेत. नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.