नगर : अभिनेता प्रथमेश परब (Prathmesh Parab) अभिनीत ‘होय महाराजा’ या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज (Trailer Relese) करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
नक्की वाचा : ‘कल्की’चा नवा टीझर प्रदर्शित, चित्रपटात ॲक्शन आणि AI चा जलवा
शैलेश एल. एस. शेट्टीने केले ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन (Hoy Maharaja Trailer)
एल एम एस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये क्राईम-कॉमेडी असलेल्या ‘होय महाराजा’ची खरी झलक पाहायला मिळते. या कथेतील प्रथमेश परबने साकारलेलं रमेशचं मुख्य कॅरेक्टर लक्ष वेधून घेतं. सुटा-बुटात इंटरव्ह्यूला निघालेल्या प्रथमेशची बोलबच्चन गिरी ट्रेलरमध्ये आहे. मामाला मात्र आपल्या भाच्यावर खूप विश्वास असतो. आपला भाचा एक दिवस खूप मोठ्या उंचीवर जाईल असा त्यांना विश्वास आहे. मामाची व्यक्तिरेखा अभिजीत चव्हाणने साकारली आहे. स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या रमेशला अचानक आयशा भेटते आणि ही ‘अनयुजवल लव्ह स्टोरी’ पुढे सरकते.
अवश्य वाचा : बचावासाठी आलेली ‘एसडीआरएफ’ची टीमच बुडाली
कलाकारांची फौज करणार प्रेक्षकांचं मनोरंजन (Hoy Maharaja Trailer)
संदीप पाठकने साकारलेला भाई, समीर चौघुलेचा बॉसचा दरारा आणि वैभव मांगलेच्या रूपातील अण्णाही ‘होय महाराजा’ म्हणत हास्याची कारंजी फुलवून धमाल करणार आहेत. ‘होय महाराजा’ मध्ये प्रथमेश आणि अंकिताची नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुणावणारे आहे. या दोघांच्या जोडीला अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौघुले आदी एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत फाईट मास्टर मोझेस फर्नांडिस यांनी या चित्रपटात अॅक्शन दिग्दर्शन केलं असून संतोष फुटाणे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. डिओपी वासुदेव राणे यांनी या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी केली आहे. गुरू ठाकूर यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार चिनार-महेश यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांनी, कोरिओग्राफी फुलवा खामकरने, तर वेशभूषा जान्हवी सावंत सुर्वे यांनी केली आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.