HPV Vaccination Campaign : नगर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा (HPV Vaccination Campaign) राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला असून, आता राज्य स्तरावर ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी आरोग्य विभागाला (Health Department) ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या आणि लाभार्थ्यांचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील सर्व आरोग्य केंद्रावर ८ मार्चपासून ही सुविधा उपलब्ध असेल, असेही आयुक्तांनी सांगितले.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
१४ ते १५ वर्षाच्या मुलींचा समावेश
मोहिमेबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी बैठकीत माहिती दिली. भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा असून ९९.७ टक्के रुग्ण हे एचपीव्ही विषाणूमुळे बाधित होतात. या आजारावर संरक्षण मिळवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. महानगरपालिकेने एकूण लोकसंख्येच्या एक टक्का म्हणजेच अंदाजे ४ हजार लाभार्थी मुलींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने १४ वर्षे पूर्ण केलेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींचा समावेश असून, मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या कालावधीत ज्या मुली १५ वर्षांच्या होतील, त्यांनाही या लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे.
मोहिमेत ‘गार्डासिल-४’ ही लस वापरली जाणार असून, ती लाभार्थी मुलीच्या डाव्या हाताच्या वरच्या भागात स्नायूमध्ये ०.५ मि.ली. या प्रमाणात दिली जाईल. विशेष म्हणजे या मोहिमेत लसचा केवळ एकच डोस दिला जाणार असून, लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थीच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्कर पेनने खूण केली जाईल. लसीच्या साठवणुकीसाठी २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाची खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण (HPV Vaccination Campaign)
शहरातील विविध नागरी आरोग्य केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केडगाव, जिजामाता, महात्मा फुले, तोफखाना, सिव्हिल, मुकुंदनगर आणि नागापूर येथील आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे लसीकरण सत्र राबवले जाईल. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांची टीम तैनात असेल, तर आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका लाभार्थी मुलींना केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी पार पाडतील. पात्र लाभार्थी मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
महापालिका क्षेत्रात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. असून, या संदर्भात महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकतीच बैठक घेतली.



