HSC Board Exam | नगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १२ वीची परीक्षा (HSC Board Exam) घेतली जात आहे. या परीक्षेत कॉपी मुक्त परीक्षा केंद्रे असावित यासाठी अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा प्रशासनाने नेहमी प्रमाणे यंदाही जोरदार तयारी केली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या घोषणांना हरताळ फासण्याचे काम झालं.पहिल्याच दिवशी भरारी पथकाच्या जाळ्यात ९ कॉपी बहाद्दर अडकले आणि प्रशासनाच्या कॉपी मुक्त परीक्षेच्या घोषणा हवेतच विरल्या.
हेही वाचा – किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
‘कॉपी बहाद्दरांचा’ सुळसुळाट (HSC Board Exam)
बारावीच्या बोर्ड परीक्षेचा बिगुल वाजला आहे, पण पहिल्याच दिवशी परीक्षेच्या पावित्र्याला गालबोट लागल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. अहिल्यानगर जिल्ह्यात इंग्रजीच्या पेपरवेळी ‘कॉपी बहाद्दरांचा’ सुळसुळाट पाहायला मिळाला. प्रशासनाने कितीही डोळ्यात तेल घालून पहारा दिला, विद्यार्थ्यांना कॉपी मुक्तीच्या शपथा दिल्या तरी विद्यार्थ्यांनी मात्र कॉपी करण्याचा मोह सोडलेला नाही.
अवश्य वाचा – सुरक्षित इंटरनेट विषयावर व्यापक स्वरूपात जागृती करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
शेवगाव, पाथर्डीत कॉपी बहाद्दर (HSC Board Exam)
पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तब्बल ९ विद्यार्थ्यांवर कॉपीच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यात सर्वात जास्त फटका पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याला बसला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर पाथर्डी तालुक्यात ७ आणि शेवगावमध्ये २ अशा एकूण ९ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. मागील वर्षीही याच तालुक्यात जास्त कॉपी केस आढळून आल्या होत्या. यात पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडीच्या संत भगवान विद्यालयात सर्वाधिक ४ विद्यार्थी कॉपी करताना रंगेहाथ पकडले गेलेत. तर कोरडगाव आणि खरवंडी येथील विद्यालयांमध्येही प्रत्येकी २ आणि १ केस समोर आली आहे. तर शेवगाव तालुक्यातील बोधेगावमध्ये दोन कॉपी बहाद्दर आढळून आले.
हे पहा – सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न ठरलं! होणार जावई नेमका कोण?
१ हजार १४३ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी (HSC Board Exam)
केवळ कॉपीच नाही, तर इंग्रजीच्या पेपरला जिल्ह्यात मोठी गैरहजेरी देखील पाहायला मिळाली. तब्बल १ हजार १४३ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली आहे. प्रशासनाने ही परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी कंबर कसली होती. तहसीलदारांची १० जणांची बैठे पथके आणि गटविकास अधिकाऱ्यांची ८ भरारी पथके तैनात असतानाही हे प्रकार घडलेत. विशेष म्हणजे, प्रभू पिंपरी केंद्रावर ‘डमी विद्यार्थी’ बसल्याची अफवा पसरली होती, ज्यामुळे पुणे बोर्डापर्यंत धावपळ उडाली. मात्र, तपासात तिथे काहीही आढळले नाही. पण प्रश्न हाच उरतो की, भरारी पथकांच्या या चक्रव्यूहातही विद्यार्थी कॉपी करण्याचे धाडस करतातच कसे? सध्या तरी या ९ विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील पेपरसाठी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.



