HSC Exam Update: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्यापासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam)सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे हे वर्ष असते. त्यामुळे विद्यार्थी देखील काही दिवसांपासून मन लावून अभ्यास करत आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रुवारी १० ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे.अशातच आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे (Nandkumar Bedse) यांनी बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.
नक्की वाचा: राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद
१५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार (HSC Exam Update)
नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत. ३३८७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. यातील ७ लाख ९९ हजार ७७३ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे असणार आहेत. तर ३,८०,६९२ विद्यार्थी हे कला शाखेची परीक्षा देणार आहेत. तर ३,२०,१५२ विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य आणि आयटीआय टेक्निकल सायंन्सचेही काही विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
अवश्य वाचा: काश्मिरी कन्येला मिळाला शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’;रुबल नागी नेमक्या कोण?
नंदकुमार बेडसे पुढे म्हणाले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही ३ फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले. यंदा आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करणार आहेत. बोर्ड स्तरावरही १० समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहेत. काही पेपर सकाळी ११ वाजता आणि काही पेपर दुपारी ३ वाजता असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे.
पेपर वाचण्याच्या वेळेत बदल (HSC Exam Update)
विद्यार्थ्यांने त्यांचे हॉलतिकिट शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याआधी ११ वाजता पेपर सुरू होण्यापूर्वी १० मिनिटांचा वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येत होता. मात्र यंदा ११ वाजता पेपर सुरु झाल्यानंतर १० मिनिटे पेपर वाचन करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे, परीक्षेच्या शेवटी हा वेळ जोडला जाणार आहे. हा यंदाच्या परीक्षेतील मोठा बदल असणार आहे. पेपर लीक होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना तासाला २० मिनिटे लेखणीक देण्यात येणार आहेत. कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आलेली आहे.



