नगर : विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या १२ वीच्या परीक्षेचा (12th Result) निकाल अखेर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ९३.३७ टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा (Kokan Highest) तर मुंबई (Mumbai) विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला.
नक्की वाचा : भारताच्या लेकीची गगन भरारी; पॅरा ॲथलेटिक्समध्ये पटकावले सुवर्णपदक
राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर पार पडली परीक्षा (HSC Result 2024)
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजेच सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
अवश्य वाचा : मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया; सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क
बारावीच्या निकालात मुलींचात डंका (HSC Result 2024)
शरद गोसावी यावेळी म्हणाले, की बारावीची सहा माध्यमांतील १५४ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली. गैरप्रकारांची संख्या घटली. राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती, तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुले तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा हा निकाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी, पालकांना दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.