HSRP Number Plate : नगर : जिल्ह्यासह राज्यात वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी (Fake Number Plate) करून गुन्हयाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केंद्रीय मोटार वाहन नियमांबाबत एचएसआरपी नंबर प्लेट (HSRP Number Plate) बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट व रीतसर नोंदणी चिन्हांचे स्टीकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १५ वर्षांपुढील वाहने असलेल्या वाहनांना रिपासिंग करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज करता येणार आहे. हे अर्ज ऑफलाईन नसून ते ऑनलाईन (Online) पद्धतीने ३१ मार्च पर्यंत करावे, अन्यथा एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Officer) विनोद सगरे यांनी सांगितले.

नक्की वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरण;आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातील फोटो आला समोर
नंबर प्लेट साठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार
अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे १२ लाख वाहने आहेत. २ लाख ६३ हजार ६५० वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. २०१९ नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येते. मात्र या पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यात एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कंपनीद्वारे दहा ठिकाणी उपकेंद्र सुरु केले आहेत. या नंबर प्लेट साठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. एचएसआरपी बुकींग करिता वाहनाची अचूक व योग्य माहितीसह विहीत शुल्क भरणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा : भारत-न्युझीलँड यांच्यात होणार अंतिम सामना; दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव
दुचाकी नंबर प्लेट करिता ४५० रु. शुल्क (HSRP Number Plate)
तसेच बुकींग करुन ९० दिवसांचे आत एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. दुचाकी व ट्रॅक्टरच्या नंबर प्लेट करिता ४५० रुपये शुल्क, तर तीन चाकी वाहनांकरिता ५०० व उर्वरित इतर सर्व वाहनांकरिता ७४५ रुपये आकारण्यात येणार आहे. १५ वर्षांपुढील वाहने असलेल्या वाहनांना रिपासिंग करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी लवकरात लवकर जुनी वाहने रिपासिंग करून एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज करावे व कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.