Hunger Strike : शेवगाव : तालुक्यातील आखेगाव ते आखेगाव तितर्फा लगत असलेल्या खडकी ओढ्यावरील पाणंद रस्ता (Farm Road) तातडीने खुला करून तो कायमस्वरूपी रस्त्यात रूपांतरित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार (Tehsildar) आकाश दहाडदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत
शेवगाव–आखेगाव तितर्फा या मुख्य रस्त्यालगत खडकी ओढ्याच्या कडेला असलेल्या काटे वस्ती व शिंदाडे वस्ती या दोन वस्त्या असून या वस्त्या मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहेत. सदर वस्त्यांवर जाण्यासाठी सध्या खडकी ओढ्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने पावसाळ्यात ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना शाळेत जाणे कठीण होते. तसेच वयोवृद्ध नागरिक, महिलांबरोबरच प्रसूतीसाठी असलेल्या रुग्णांना ने-आन करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा
कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा (Hunger Strike)
खडकी ओढ्याच्या कडेने काही नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता खुला होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सदर अतिक्रमण तातडीने हटवून पाणंद रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा काटे वस्ती व शिंदाडे वस्तीवरील सुमारे १५० ते २०० नागरिक कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन दिल्यापासून १५ ते २० दिवसांच्या आत हा रस्ता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता (मा. बाळासाहेब ठाकरे पाणंद रस्ता योजना) अंतर्गत समाविष्ट करून तातडीने काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार शेवगाव, सर्कल अधिकारी शेवगाव तसेच तलाठी आखेगाव तितर्फा यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, विनायक काटे, आसाराम काटे, एकनाथ काटे, शिवाजी मराठे, अशोक मराठे, तात्यासाहेब शिंदाडे, सौरभ काटे, चैतन्य मराठे, शंकर काटे, दादाभाऊ काटे, रखमाजी काटे, निखिल मराठे, वैभव काटे, पुष्पकांत काटे यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.



