Hunger Strike : पारनेर: शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून (Urban Development Department) मंजूर करण्यात आलेल्या १० लाख रुपयांचा निधी नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) उदासीन आणि आडमुठ्या धोरणामुळे रखडला असल्याचा आरोप करत, याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) (Republican Party of India (Athawale)) आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवार २६ जानेवारी २०२६ पासून पारनेर नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा आर पी आय ( आठवले गट) युवक तालुकाध्यक्ष प्रदिप संपतराव नगरे आणि शहर अध्यक्ष सुधीर सुनील सोनवणे यांनी पारनेर नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती
या निवेदनात नमूद केले आहे की,
पारनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास मंत्रालयाकडून १० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या कामाचे मंजुरी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्राप्त झाले असून, कामाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतीच्या ‘नाहरकत’ ठरावाची आवश्यकता आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासनाकडून हा ठराव देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
हे देखील वाचा: समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
एका ठरावाअभावी हे काम लालफितीत अडकले (Hunger Strike)
स्मारकाच्या कामासाठी निधी उपलब्ध असूनही केवळ एका ठरावाअभावी हे काम लालफितीत अडकले आहे. नगरपंचायतीच्या या भूमिकेमुळे समाजबांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “नगरपंचायतीचे धोरण हे विकासाला खीळ घालणारे असून, महापुरुषांच्या स्मारकाबाबत अशी उदासीनता दाखवणे दुर्दैवी आहे,” अशी भावना आरपीआय कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही वारंवार मागणी करूनही नगरपंचायत ठराव पास करण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही २६ जानेवारी रोजी पारनेर नगरपंचायत कार्यालय समोर उपोषण करणार आहोत. या निवेदनावर लवकेश सूर्यवंशी, महेश उमाप, पुनीत आल्हाट, शुभम भिंगारदिवे, जीवन घंगाळे, सनी सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, दया सोनवणे तसेच सर्व आंबेडकरी अनुयायी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदन जिल्हाधिकारी, पारनेर तहसील कार्यालय, पारनेर पोलीस स्टेशन, पारनेर नगरपंचायत आदींना देण्यात आले आहे.



