Hunger Strike : नेवासा : तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने केलेल्या ग्रामसभा (Gram Sabha) ठराव केला होता. शिव्या बंदी व विधवा महिला सन्मान बाबतीत शासन निर्णय जारी करून माता-भगिनींचा जागतिक महिला दिनी (International Women’s Day) सन्मान करावा, या मागणीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी शनिवारी (ता.८) गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे.
नक्की वाचा : महाकुंभमेळ्यात ४५ दिवसांत बोट व्यावसायिक कुटुंबानं कमावले ३० कोटी
ग्रामसभेत शिव्या बंदी व विधवा महिला सन्मानबाबत ठराव
सौंदाळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत शिव्या बंदी व विधवा महिला सन्मानबाबत ठराव घेऊन मंजूर केले आहेत. ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने राहून आपण जन्म घेतो त्या पवित्र देहाला शिव्या देऊन, अर्वाच्य भाषेत बोलून आपण अपमानित करतो. वास्तविक भांडण झाल्यावर मोठ्याने आरडून ओरडून शिव्या देत असताना तिथे माता-भगिनींचा काही संबंध नसतो परंतु तमाम महिलांना तेथे अपमानित केले जाते. तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन, कोर्टापर्यंत हे प्रकरण जाते. त्यामुळे वेळ, पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागतो. म्हणून सौंदाळा ग्रामपंचायतने शिव्या बंदीचा ठराव करून माता-भगिनींचा सन्मान केला आहे. शिव्या देणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, त्यामुळे शिव्या देणे थांबले आहे.
अवश्य वाचा : शेतकऱ्याने लाडक्या ‘नंद्या’ बैलाचा केला दशक्रिया विधी
विधवा महिलेवर पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी (Hunger Strike)
तसेच पतीच्या निधन होण्यामध्ये स्त्रीचा कुठलाही दोष नसतो. परंतु तिचे कुंकू पुसणे, जोडवे काढण्यापासून सुरुवात होते. ते तिला धार्मिक किंवा कौटुंबिक लग्न समारंभात सहभागी केले जात नाही. तिला पांढऱ्या पायाची उपमा देऊन अपमानित केले जाते. परंतु पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख गेला म्हणून तिच्यावर येते. तिला समाजाने धीर देणं गरजेचं असतं. विधवा महिलेवर मुलांच्या शिक्षणाची, कुटुंब खर्चाची, वृद्ध सासू-सासर्यांच्या औषध उपचारांच्या खर्चाची जबाबदारी येते. काही विधवांचे लहान मूलं असतात. त्यांना बापाच्या सावलीची व तिला पतीची गरज असते. अशावेळी तिला जर पती गेल्यानंतर पुनर्विवाहस परवानगी दिली तर कुटुंब पुन्हा व्यवस्थित होऊन जीवन आनंदी होऊ शकते. म्हणून सौंदाळा गावाने विधवा प्रथा बंद करून विधवांना धार्मिक व कौटुंबिक तसेच लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी देऊन त्यांना कुंकू- टिकली, सौंदर्य प्रसाधनाची, दाग-दागिने, मंगळसूत्र घालण्यास सांगून विधवा पुनर्विवाह परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व लाडक्या बहिणींचा शिव्याबंदी, विधवा सन्मान कायदा करून त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी वरीलप्रमाणे महिलांच्या सन्मानार्थ शासन निर्णय जारी करावा अन्यथा शनिवारी (ता.८) सकाळी ११ वाजता महिला दिनी सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असे निवेदन मुख्यमंत्री व प्रशासनाला दिले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने आरगडे यांनी सौंदाळा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात उपोषण सुरु केले आहे.