नगर : ‘मी ज्यांना सहकार्य करतो त्यांनी मलाही सहकार्य करावे, मी काही साधू-संत नाही’,असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बीडमध्ये (Beed) केले. अजित पवार आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड दौऱ्यावर आहेत. बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी बीडमधील गुन्हेगारी, खंडणी, पिस्तूलांची दहशत यासह विकास कामांवरही भाष्य केले.
नक्की वाचा : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी,व्हीव्हीआयपी पास रद्द; उत्तर प्रदेश सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
‘मी काही साधू-संत नाही,मी सरळ मार्गी आहे'(Ajit Pawar)
यावेळी विकास कामांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “जी कामे माझ्या स्तरावर आहेत, ती मी करेन, पण जी कामे मुख्यमंत्र्यांचा स्तरावरील आहेत, ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन. असे करताना मी स्थानिक लोक प्रतिनिधींनाही विश्वासत घेईन. मंत्रीमंडळात तुमच्या भागातील दोन सहकारी आहेत. एक धनंजय मुंडे आणि दुसऱ्या पंकजाताई. त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ. कामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पण मी जर भदेभाव करत नसेन, तर मी ज्यांची कामे करतोय त्यांनीही भेदभाव केला नाही पाहिजे. नाहीतर मी त्यांचे काम करणार आणि ते खाली तिसरेच काहीतरी करणार, असले मी खपवून घेणार नाही. मी सरळ सांगणार तुमचे हे दुटप्पी वागणे असेल तर मी काम करणार नाही. मी काही साधू-संत नाही. मी सरळ मार्गी आहे.”
अवश्य वाचा : हमालाची मुलगी झाली अधिकारी;एमपीएससी परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव (Ajit Pawar)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड चर्चेत आले आहे.अशात देशमुख यांच्या हत्येमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील नेतेही करत आहेत. या प्रकरणी केज तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू चाटे याला अटक झाल्यानंतर अजित पवार यांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावरही मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. पण अजित पवार यांनी जोपर्यंत कोणी दोषी आढळणार नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे.