Illegal Alcohol : श्रीरामपूर : गोवर्धन (ता.श्रीरामपूर) हद्दीमध्ये अवैधरित्या दारू (Illegal Alcohol) विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानात रामपूर येथील सुमारे ८० ते ९० महिलांनी अचानकपणे आक्रमक होत हल्ला चढवला व हे झोपडीवजा दुकान काही अंशी पेटवले. तसेच वीरगाव (ता. वैजापूर) पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलच्या पाठीमागील ऊसातून अवैध दारूच्या सुमारे १०० पेक्षा अधिक दारूच्या बाटल्या फोडल्या. यापूर्वीही महिलांनी जून महिन्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना अवैध दारू विक्रीबाबत निवेदन देत आंदोलनाचा इशारा (Warning of Protest) दिला होता. श्रीरामपूर व वीरगाव पोलिसांच्या कामाविषयी नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर…
लहान मुलांसह पुरुष मंडळी दारूच्या आहारी
रामपूर येथील महिलांनी दारू बंदीसाठी ग्रामसभा घेत राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस अधीक्षकांना नगर येथे जाऊन लेखी स्वरूपात निवेदन दिले होते. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दारू उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनी सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी छापे टाकल्याने दारू विक्रीला प्रतिबंध झाला होता. त्यानंतर रामपूर गाव वगळता लगतच्या गावांमध्ये अवैध दारु व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने रामपूर येथील लहान मुलांसह पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेली. अखेर रविवारी (ता.१) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महिलांनी प्रथम गोवर्धन हद्दीतील ओढ्यात काटेरी कुंपणात सुरू असलेले अवैध दारूच्या दुकानावर हल्ला चढविला. दारू विक्री करणाऱ्या दुकानदाराला समज देवूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सदर झोपडी वजा ग्रीन शेडला आग लावली. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा गोदावरी नदीच्या पलीकडे विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभुळगाव गंगा शिवारातील हॉटेलकडे वळविला. हॉटेल चालकाला समज दिली. तसेच हॉटेलच्या पाठीमागील उसात लपविलेल्या सुमारे शंभरहून अधिक बाटल्या रस्त्यालगत आणून फोडल्या.
अवश्य वाचा : मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात
महिलांचा मोठा सहभाग (Illegal Alcohol)
आंदोलनात छबुबाई धनवटे, बबई धनवटे, ताराबाई इरसे, संगीता कोळेकर, रुपाली कुसळकर, रुक्मिणी उपळकर, विजया खैरे, संगीता खैरे, सुरेखा पिटेकर, इथाबाई पांढरे, सुमनबाई जाधव, रेखा जाधव, सुनीता धनवटे, ज्योती पांढरे, आशाबाई पांढरे, रेश्मा धनवटे, सुमनबाई धनवटे, आशाबाई भडांगे आदींसह महिला उपस्थित होत्या.
श्रीरामपूर व वैजापूर या दोन्ही तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावालगतचे अवैध दारू व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांच्याकडे महिलांसह जाणार आहे. कारवाई न झाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा करू, असा इशारा सरपंच नितीन शिंदे व सदस्य अमित कोकरे यांनी दिला.