Illegal liquor sales | अकोले तालुक्यात बेकायदा दारूविक्रीविरोधात कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दोन पंचांसह रचला सापळा

0

Illegal liquor sales | अकोले: अवैधरित्या देशी दारूची वाहतूक (Illegal liquor sales) करणाऱ्या एका कारवर श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने धामणगाव पाट ते कोतूळ रस्त्यावर यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.१६) श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांच्या कार्यालयातील पथकाला अकोले पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर (Illegal business) कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे आणि राजेंद्र बिरदवडे हे पथक गस्त घालत होते. यावेळी धामणगाव पाट ते कोतूळ रस्त्याने एका कारमधून दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस हेडकॉन्स्टेबल लोढे यांना मिळाली.

अवश्य वाचा- रंधा धबधबा येथे होणार काचेचा पूल

दोन पंचांसह रचला सापळा (Illegal liquor sales)

या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत कोतूळ क्षेत्रातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल जाधव आणि महेंद्र गुंजाळ यांना सोबत घेत दोन पंचांसह हायटेक नर्सरी जवळ सापळा रचला असता सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संबंधित कार येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या आढळल्या. गाडीची झडती घेतली असता ६१ हजार १५० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ९२४ बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी गाडी चालक अक्षय मारुती वाकचौरे (वय २६, रा. परखतपूर, ता. अकोले) आणि त्याच्यासोबत असलेला राजेंद्र बाळासाहेब तांबे (वय ३०, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी ही दारू अभिजीत रणशूर (रा. संगमनेर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या कारवाईत दारूसाठा, कार आणि दोन मोबाईल असा एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या अक्षय वाकचौरे, राजेंद्र तांबे आणि पसार असलेला अभिजीत रणशूर यांच्या विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस करत आहेत.