India Vs Australia | भारत फायनलमध्ये; ऑस्ट्रेलियावर ‘विराट’ विजय

0
India-Vs-Australia
India-Vs-Australia

India Vs Australia | नगर : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) संघांमध्ये झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर चार गडी व ११ चेंडू राखून विजय मिळवत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. या विजयाच्या जोरावर भारताने २०२३ एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (ता. ९) होणार आहे.

नक्की वाचा : पूर्ववैमनस्यातून अपहृत तरुणाचा खून; आणखी पाच आरोपी ताब्यात

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद (India Vs Australia)

आज (ता. ४) झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद होत राहिले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांमध्ये २६४ धावाच जमवू शकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक ७३ धावा केल्या. त्याला अॅलेक्स कॅरीने (६१ धावा) चांगली साथ दिली. मात्र, या दोघांना संघासाठी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून मोहम्मद शामीने तीन, रवींद्र जडेजा व वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन तर हार्दिक पांड्या व अक्षर पटेलने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

विराट कोहलीची उपयोगी खेळी (India Vs Australia)

२६५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल व कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाले. संघाच्या ४३ धावा झालेल्या असताना संघाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. अशा संकटकाळी विराट कोहलीने मैदानात नांगर रोवला. सुरुवातीला श्रेयस अय्यर (४५ धावा) तर नंतर अक्षर पटेल (२७ धावा) व केएल राहुल (नाबाद ४२ धावा) यांना बरोबर घेत विराट कोहलीने (८४ धावा) महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम जाम्पा व नेथन एलिसने प्रत्येकी दोन तर बेन ड्वॉरशुइस व कूपर कॉनोली यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.भारतीय संघाने ४८.१ षटकांत सहा गडी गमावत २६७ धावा केल्या. विराट कोहली सामन्याचा मानकरी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here