India vs New Zealand | नगर : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना आज (ता. ९) दुबईमध्ये खेळवण्यात आला. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्युझीलँड (India vs New Zealand) असा झाला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने न्युझीलँडवर चार गडी व सहा चेंडू राखून विजय मिळवला. न्युझीलँडचा रचिन रवींद्र मालिकावीर तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा सामनावीर ठरला.
नक्की वाचा : महाकुंभमेळ्यात ४५ दिवसांत बोट व्यावसायिक कुटुंबानं कमावले ३० कोटी

न्युझीलँडची चांगली सुरुवात पण…(India vs New Zealand)
न्युझीलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्युझीलँड संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर विल्यम यंग व रचिन रवींद्रने ५७ धावांची भागीदारी केली. वरुण चक्रवर्तीने विल्यम यंगला (१५ धावा) बाद करत न्युझीलँडला पहिला धक्का दिला. त्यानंतर रचिन रवींद्र (३७ धावा), केन विल्यमसन (११ धावा) व टॉम लेथम (१४ धावा) हे तीनही फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे न्युझीलँड संघाच्या तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, डॅरिल मिचेल (६३ धावा), ग्लेन फिलिप्स (३४ धावा) व मायकेल ब्रेसवेल (नाबाद ५३ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. न्युझीलँड संघाने ५० षटकांत सात गडी गमावत २५१ धावा केल्या. भारताकडून वरुण चक्रवर्ती व कुलदीप यादवने प्रत्येकी दोन तर मोहम्मद शामी व रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
अवश्य वाचा : शेतकऱ्याने लाडक्या ‘नंद्या’ बैलाचा केला दशक्रिया विधी

भारताने विजय आणला खेचून (India vs New Zealand)
२५२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांची भक्कम सुरुवात दिली. संघाचा धावफलक १०५ वर असताना शुभमन गिल (३१ धावा) बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली अवघी एक धाव करत तंबूत परतला. या धक्क्यांतून भारतीय संघ सावरत असताना कर्णधार रोहित शर्मा ७६ धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यर (४८ धावा) व अक्षर पटेल (२९ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर के.एल. राहुलने (नाबाद ३४ धावा) हार्दिक पांड्या (१८ धावा) व रवींद्र जडेजा (नाबाद ९ धावा) यांच्या समवेत विजय खेचून आणला. भारतीय संघाने ४९ षटकांत सहा गडी गमावत २५४ धावा करत विजय मिळवला. न्युझीलँडकडून मिचेल सँटनर व मायकेल ब्रेसवेलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.