नगर : आयपीएल २०२४ च्या रणसंग्रामात अंतिम विजय कोलकाता संघाने (Kolkata Knight Riders)आपल्या नावावर केला आहे. कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची (Pat Cummins) विविध स्पर्धांतील जेतेपदाची मालिका खंडीत करत कोलकाताच्या संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या करंडकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. मिचेल स्टार्कचा भेदक मारा आणि त्याला त्याला वेगवान गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे कोलकाताने रविवारी (ता.२७) झालेल्या अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघावर आठ गडी आणि ५७ चेंडू राखून विजय मिळवत ‘आयपीएल’च्या १७ व्या हंगामाचे जेतेपद पटकावले.
नक्की वाचा : भारताच्या अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास; कान्समध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
हैदराबादचा संघ ११३ धावांतच गारद (IPL 2024 Final)
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मात्र, हैदराबादचे फलंदाज आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवू शकले नाहीत. हैदराबादचा संघ १८.३ षटकांत ११३ धावांतच गारद झाला. मग कोलकाताने १०.३ षटकांतच २ बाद ११४ धावांची मजल मारत जेतेपदावर कब्जा केला. कोलकाता संघाचे हे २०१२ आणि २०१४ नंतर तिसरे जेतेपद ठरले. कोलकातासाठी वेंकटेश अय्यर (२६ चेंडूंत नाबाद ५२) आणि रहमनुल्ला गुरबाझ (३२ चेंडूंत ३९) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.
अवश्य वाचा : जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर
कोलकाताची दमदार खेळी (IPL 2024 Final)
मिचेल स्टार्क सह सर्वच वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करताना कोलकाताला अर्धी लढाई जिंकवून दिली होती. स्टार्कने पहिल्याच षटकात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला. पुढील षटकात वैभव अरोराने ट्रॅव्हिस हेडला खातेही न उघडता माघारी धाडत हैदराबादला मोठा धक्का दिला. स्टार्कने राहुल त्रिपाठीलाही फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. अंतिम फेरीच्या दडपणाखाली हैदराबादची आघाडीची फळी पार ढेपाळली. यानंतर मधल्या फळीतील एडीन मार्करम (२०), नितीश कुमार रेड्डी (१३) आणि हेन्रिक क्लासन (१६) काहीशी झुंज दिली. मात्र, कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा राखताना हैदराबादच्या फलंदाजांना ठराविक अंतराने बाद केले. सुरुवातीला स्टार्क, वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांच्यासमोर हैदराबादच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा निभाव लागला नाही, तर तळाच्या फलंदाजांना आंद्रे रसेलने माघारी पाठवले.
११३ सनरायजर्स हैदराबादचा संघ ११३ धावांतच गारद झाला. ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोणत्याही संघाची ही सर्वांत निचांकी धावसंख्या ठरली. कोलकाता नाइट रायडर्सने दुसऱ्यांदा चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर ‘आयपीएल’चा करंडक उंचावला. याआधी २०१२ मध्ये कोलकाता संघाने आपले पहिले जेतेपद याच मैदानावर मिळवले होते