Israel Gaza War: गाझा युद्धात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण; कर्नल वैभव काळे यांचा हल्ल्यात मृत्यू 

कर्नल काळे हे सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने राफा येथील युरोपीय इस्पितळाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

0

नगर : इस्रायल वर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता गाझा (Gaza War) पट्टीत झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात सोमवारी (ता.१५) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून काम करणारे कर्नल वैभव अनिल काळे (Vaibhav Anil Kale) या माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी गाझा युद्धाला तोंड फुटल्यापासून गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी असल्याचे सांगण्यात आले आहे.

नक्की वाचा : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी सज्ज; मुंबईत रोड शो

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिलेत. कर्नल वैभव काळे हे मूळचे नागपूरचे होते. भारतीय लष्करातून सन २०२२ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात रुजू झाले होते.

अवश्य वाचा :  राज्यात चौथ्या टप्प्यासाठी ११ मतदारसंघात ‘इतके’ मतदान

कर्नल काळे यांची कारकीर्द (Israel Gaza War)

कर्नल काळे एप्रिल २००४ मध्ये भारतीय लष्करी सेवेत दाखल झाले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सन २००९ ते २०१० दरम्यान सेवा बजावली होती. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची पदवी मिळवली. भारतीय लष्करात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात सियाचीन, ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेचा भाग म्हणूनही ते कांगोमध्ये कार्यरत होते. भारतीय लष्करात त्यांनी २२ वर्षांची सेवा बजावली.

भारतीय लष्करामधून २०२२ मध्ये वैभव काळेंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर पुण्यात वास्तव्याला असताना त्यांनी दोन खासगी कंपन्यांमध्ये नोकरीही केली. या कंपन्यांमध्ये ते सुरक्षेसंदर्भातील उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर मानव सेवा करण्याच्या उद्देशाने वैभव काळेंनी संयुक्त राष्ट्रांत काम करण्यास पसंती दिली होती. लोकांच्या आयुष्यात आपण काहीतरी बदल घडवणारं काम करावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.

कर्नल काळेंचा मृत्यू कसा झाला ? (Israel Gaza War)

कर्नल काळे हे सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने राफा येथील युरोपीय इस्पितळाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. काळे यांच्या मृत्यूबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांनी तीव्र शोक व्यक्त करण्याबरोबरच या हल्ल्याच्या संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here