नगर : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांचं वृद्धापकाळाने निधन (Passes away) झाले आहे. पुण्यातील (Pune) राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८६ व्या वर्षी जयंत नारळीकर यांनी जगाचा निरोप घेतला. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर यांना कोणतही दीर्घ आजारपण नव्हते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले होते.
नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात २ ‘जिहादी’ बनले व्हाईट हाऊसचे सल्लागार!
डॉ. जयंत नारळीकर याचा जन्म कोल्हापूरमध्ये १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले. त्याकाळी जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केले होते. फ्रेड हॉयल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते.
जयंत नारळीकर यांची कारकीर्द (Jayant Narlikar)
जगभरातील आघाडीच्या खगोल शास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉयल यांचा समावेश व्हायचा. त्याकाळात हॉयल -नारळीकर ही थिअरी प्रसिद्ध झाली होती. जयंत नारळीकर यांना १९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतले. त्यानंतर जयंत नारळीकर हे टीआयएफआरमध्ये दाखल झाले. भारताचं आजचं खगोलशास्त्राचं जे संशोधन आणि प्रगती आहे, त्यामध्ये जयंत नारळीकर यांनी पाया रचला होता.ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते.पुण्यातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना त्यांनी १९८८ मध्ये केली आणि त्याचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते.
डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा (Jayant Narlikar)
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. तसेच अंतराळ आणि विज्ञान,आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे , नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र), अशी इतर विज्ञानविषयक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत.
डॉ. जयंत नारळीकर यांना मिळालेले गौरव (Jayant Narlikar)
जयंत नारळीकर यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मविभूषण,पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.