Jayant Patil : ‘मुख्यमंत्री जयंत पाटील अशा घोषणा देऊ नका, त्यासाठी खूप उठा-बशा काढव्या लागतात’,असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. ते शिवस्वराज्य यात्रेच्या (Shivswarajya Yatra) समारोपाच्या भाषणात बोलत होते.
आमचा पक्ष फुटला तेव्हा.. (Jayant Patil)
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता संघर्षासाठी तयार झाला आहे. आमचा पक्ष फुटला तेव्हा आम्हाला हिणवलं जात होतं की कुणी राहिलं नाही तुम्हाला, प्रचाराला तरी माणसं मिळतील का? अशी अवहेलना केली जात होती. मात्र शरद पवार या नावाचं वलयच असं आहे की, अनेक गोष्टी पुढे घडत गेल्या.असा एकही जिल्हा आणि तालुका नाही जिथे शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा : ‘आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला निवडून आणा’-प्रकाश आंबेडकर
‘लाडकी बहीण योजना हे महायुतीचं पुतना मावशीचे प्रेम‘ (Jayant Patil)
लाडकी बहीण सारख्या सगळ्या योजना म्हणजे महायुती सरकारचे पुतना मावशीचे प्रेम आहे. २० नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या योजना चालणार आहेत असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मला भाजप आणि आमच्या पक्षातलेच लोक सांगत होते की तिकडे चला. मी त्यांना दिवार च्या संवादाप्रमाणे उत्तर दिलं तिकडे सगळं असेल, आमच्याकडे शरद पवार आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणाईला आजही त्यांची भुरळ पडली आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
अवश्य वाचा : आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम
शिवस्वराज्य यात्रेची ही शेवटची सभा आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. ते सगळ्या घरात जाऊन सांगा. आपल्या सगळ्यांना चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे चिन्ह ठेवलं. छत्रपती शिवरायांच्या विचारांवरचा महाराष्ट्र घडवा, अशी शपथ आम्ही सगळ्यांनी घेतली होती. महाराष्ट्रात असा मतदारसंघ मिळणार नाही. प्रचाराची सभा न घेता मला महाराष्ट्राने सातवेळा निवडून दिल आहे. माझ्याविरोधात कुणी शिव्या दिल्या की कार्यभाग साधला जातो,असेही जयंत पाटील म्हणालेत.