Kabaddi Tournament : कर्जत : १७ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या (Kabaddi Tournament) फेर सामन्यात कर्जतच्या समर्थ विद्यालयाने पुन्हा एकदा न्यू इंग्लिश स्कुल टाकळीभान (ता.श्रीरामपूर) संघावर एकतर्फी मात करीत विभागीय पातळीवर आपले नाव कोरले. तब्बल १२ गुणांनी कर्जतने टाकळीभानचा पराभव केला. सोमवारी हा अंतिम फेर सामना जिल्हा क्रीडा संकुल अहिल्यानगर (District Sports Complex Ahilyanagar) येथे पार पडला. यापूर्वी हा अंतिम सामना कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात (Dada Patil Mahavidyalaya) पार पडला होता. त्यात देखील कर्जतने बाजी मारली होती. मात्र तो सामना वादग्रस्त ठरल्याने आज नव्याने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सामना खेळविला गेला.
अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!
कर्जतचा सामना पुन्हा खेळविण्यात केली हाेती मागणी
३ ऑक्टोबर रोजी कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात समर्थ विद्यालय कर्जत आणि न्यू इंग्लिश स्कुल टाकळीभान यांच्यात १७ वर्षे वयोगटाचा कबड्डीचा अंतिम सामना खेळविण्यात आला होता. या चुरशीच्या सामन्यात कर्जतने बाजी मारली. मात्र, त्या सामन्यात बाहेरील नागरिकांनी गोंधळ घातल्याने थांबविण्यात आला होता. पुकार दिल्यानंतर टाकळीभानचे खेळाडू मैदानात न उतरल्याने मैदानी पंचांनी कर्जतला विजयी घोषित करीत सोपस्कार पूर्ण केला. परंतु या सामन्यानंतर क्रीडा क्षेत्रात टाकळीभान संघाने आयोजकांवर आरोप करीत कर्जतचा सामना अवैध ठरवत तो पुन्हा नव्याने खेळविण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते.
नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड
कर्जत समर्थ विद्यालयाने मिळवला एकतर्फी विजय (Kabaddi Tournament)
त्या अनुषंगाने सोमवारी (ता.३) हा अंतिम सामना नव्याने जिल्हा क्रीडा संकुल अहिल्यानगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश झगडे, माजी क्रीडा अधिकारी अजय पवार, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मिस्कीन, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊराव वीर आणि पंचप्रमुख बळीराम सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आला. या सामन्यात कर्जत समर्थ विद्यालयाने सुरुवातीपासूनचा आक्रमक खेळ करीत टाकळीभान संघाला १२ गुणांनी पराजीत करीत एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात कर्जतचे ५२ तर टाकळीभान संघाचे ४० गुण झाले होते. कर्जतचे समर्थ विद्यालय विभागीय पातळीवर खेळण्यास पात्र ठरला.



