Karjat : कर्जत : राशीन गावाचा सामाजिक सलोखा कायम राहावा यासह कायदा सुव्यवस्थेच्या (Law and Order) अधीन राहून भगवा स्वराज्य ध्वज आहे त्याच ठिकाणी दिमाखात उभा राहील. तसेच करमाळा चौकास क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकच नाव कायम राहणार आहे. त्याचे नामांतर होणार नाही. तसेच दोन्ही कार्यासाठी मराठा-ओबीसी (Maratha-OBC) समाज एकत्र येत त्याचे सुशोभीकरण करतील, असा सर्व समावेशक तोडगा काढला असून याबाबत तालुका प्रशासनास अवगत केले असल्याची माहिती दोन्ही समुदायाने पत्रकार परिषदेत (Press Conference) दिली. गुरुवारी (ता.२४) पुन्हा एकदा राशीनच्या प्रश्नावर तालुका प्रशासनाने बैठक आयोजित केली होती.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू; कोलकाता येथे होणार अंत्यसंस्कार
दोन्ही गट उभे राहिले होते समोरासमोर
रविवारी (ता.१३) मध्यरात्री राशीन (ता.कर्जत) येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकात भगवा झेंडा उभारणीवरून तसेच चौक नामांतर होण्याच्या कारणावरून दोन गटात वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गट समोरासमोर उभे राहिले होते. यात कर्जत आणि राशीन शहर बंद देखील पाळण्यात आला होता. याच अनुषंगाने कर्जत तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समुदायाची शांतता बैठक १९ जुलै रोजी कर्जत तहसील कार्यलयात पार पाडली होती. मात्र त्यात देखील एकमत न झाल्याने चार दिवसांचा आणखी अवधी घेत दोन्ही समाजाने बैठक स्थगित केली होती.
अवश्य वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
प्रमुख व्यक्तींनी चर्चेअंती एकमत ठरवले (Karjat)
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा दोन्ही समुदायात तहसीलदार गुरू बिराजदार, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी बैठक घडवत सकारात्मक चर्चा घडवली. यामध्ये दोन्ही समुदायाच्या प्रमुख व्यक्तींनी चर्चेअंती गावाचा सामाजिक सलोखा पूर्वीप्रमाणेच अबाधित राहत आहे त्याच ठिकाणी भगवा स्वराज्य ध्वज उभा करीत चौकास क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकच नाव देण्यात येईल, असे एकमत ठरवले. यासह भगवा ध्वज आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक सुशोभीकरण करण्यासाठी सर्वानुमते विशेष आराखडा बनवू असे जाहीर केले. काही अफवांच्या आधारे जातीय तणाव निर्माण झाला होता. मात्र आता तो कसलाही तणाव दोन्ही समाजात नसून आम्ही सर्व एकच आहोत या भावनेने बैठकीचा समारोप करण्यात तालुका प्रशासनास गुरुवारी यश आले.
राशीन प्रकरणावरून उद्या (ता. २५) ओबीसी समाजाच्यावतीने राशीन, कर्जत आणि मिरजगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. आज दोन्ही समाजाच्या सकारात्मक चर्चेने तोडगा काढून समेट घडला. त्यामुळे उद्याचा राशीन बंद मागे घेण्यात आली असल्याची माहिती महात्मा फुले फाऊंडेशनकडून देण्यात आली.