Ram Shinde: कर्जत : कर्जत-जामखेड (karjat-Jamkhed) मतदारसंघासाठी आपण सर्वांच्या हिताची एमआयडीसी (MIDC) उभारणार असून यासाठी सर्व नियम,निकष पूर्ण करणारी जागा संपादित करण्यात येईल. औद्योगिक विभागाच्या(Industrial Division) निकष आणि नियमानुसार कर्जत तालुक्यातील सहा ठिकाणची माहिती संकलित करण्यात आली आहे. सर्वांना विश्वासात घेत सबंधित अधिकारी आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करतील, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी केले.
नक्की वाचा : नगरच्या मदारची ‘थर्ड आय एशियन फिल्म’ फेस्टिव्हलसाठी निवड
ते कर्जत येथे नियोजित एमआयडीसी संदर्भातील बैठकीत बोलत होते. यावेळी नाशिक एमआयडीसी विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले, शासनाने १५ दिवसांचा अवधी दिला होता. मात्र आदेश निघाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अधिकारी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी प्रयत्न करीत आहे. एमआयडीसी जागेचा प्रस्ताव ओपन फॉर ऑल असून जागा कोणत्याही भागातील असू शकते. औद्योगिक विभागाच्या निकष आणि नियमानुसार एमआयडीसी साठी जागा समतल असावी. त्यालगत राष्ट्रीय महामार्ग, पाण्याची सोय, विजेची सोय आणि विशेष म्हणजे जागा सलग असणे आवश्यक आहे. ती संपादित करताना सर्वसामान्य नागरिकांना विचारात घेत जागा ठरविण्यात येईल. वास्तविक पाहता पूर्वीची मौजे पाटेवाडी-खंडाळा भागातील जागा सदोष होती. त्या ठिकाणी वनविभाग, इको सेन्सेटिव्ह झोनचा प्रश्न उपस्थित झाला होता.
अवश्य वाचा : भारतीय महिला संघाची कमाल ; ३४७ धावांनी उडवला इंग्लंडचा धुव्वा
यासह लगतच्या ग्रामस्थांनी जागा देण्यासाठी विरोध केला. बागायती जमीन घेण्यात येऊ नये, म्हणून ठराव झाला. त्यामुळे तुकड्या-तुकड्याची एमआयडीसी होणे शक्य नाही. तसेच ईडी कारवाई झालेली नीरव मोदींची जमीन प्रस्तावित आराखड्यात असल्याने तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. आणि तातडीने नवीन जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले. त्या अनुसार रविवारी संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाची बैठक घेण्यात आली. मिशन मोड वर यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशा सूचना राम शिंदे यांनी बैठकीत दिल्या.
यामध्ये कोंभळी-रमजान चिंचोली, वालवड-सुपे, पठारवाडी, कुंभेफळ- अलसुंदे- कोर्टी, देऊळवाडी आणि थेरगाव या सहा जागेची पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मागणी केली. याशिवाय आणखी महत्वाची ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास त्याचा विचार देखील करावा,अशी मागणी बैठकीत पुढे आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके, बाजार समितीचे संचालक नंदराम नवले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शबनम इनामदार, अशोक खेडकर, पप्पू धुमाळ, काका धांडे, युवक अध्यक्ष सोमनाथ शिंदे, धनराज रानमाळ, प्रकाश शिंदे, सुनिल यादव, गणेश क्षीरसागर, गणेश पालवे, पप्पू धोदाड, अनिल गदादे, राहुल निंबोरे, बंटी यादव आदी उपस्थित होते.