डॉ. अफरोजखान पठाण
…………………………………….
Karjat Jamkhed Constituency: कर्जत : विधानसभेची रणधुमाळी (Legislative Assembly Election) सुरू होण्यास अगदी थोडा अवधी शिल्लक असून इच्छुकांची धावपळ वाढली आहे. कर्जत-जामखेडमध्ये (Karjat Jamkhed Constituency) महायुतीकडून माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) तर महाविकास आघाडीद्वारे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी विविध कार्यक्रम घेत शक्तिप्रदर्शन करण्याचा सपाटा लावला आहे. तर तिसरी आघाडी म्हणून आमदार शिंदे आणि पवार यांच्यावर नाराज असणाऱ्यांनी गावनिहाय बैठका सुरू केल्या आहे. यात विखे गटाचे जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अजित पवार गटाचे राजेंद्र गुंड तर काँग्रेसचे अॅड. कैलास शेवाळे तसेच नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) गटाला सोडचिठ्ठी देणारे प्रा. मधुकर राळेभात, ओबीसी (OBC) कोट्यातून दादा सोनमाळी यांनी आपण ऐनवेळी रिंगणात उतरू शकतो, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.
नक्की वाचा: ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष (Karjat Jamkhed Constituency)
यंदा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागणार आहे. या मतदारसंघात मागील प्रतिस्पर्धी असणारे राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सरळ लढती होण्याची चिन्हे आजमितीस तरी दिसत आहे. मात्र, यंदा रोहित पवार यांच्याकडे मागील निवडणुकीत असणारी स्थानिक नेत्यांची फळी विस्कळीत झालेली दिसत आहे. त्यातील काहींनी महायुतीच्या गटात सामील होत त्यांना विधानसभेच्या आखाड्यात घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसच्या कर्जत-जामखेड पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवारांनी काँग्रेसचा मतदारसंघ पुन्हा त्यांना सोडावा, असे म्हणत कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले होते. तोच कित्ता शिवसेना ठाकरे गटाने देखील घेतला. यासह जामखेडचे प्रा. मधुकर राळेभात यांनी देखील शरद पवार गटास सोडचिठ्ठी देत आपला राजकीय दबाव कायम ठेवला. राळेभात यांना भाजपाचे माजीमंत्री तथा आमदार राम शिंदेंनी तुमचा मान सन्मान राखण्याची ग्वाही देत भाजपात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, राळेभात वेट अँड वॉचची भूमिका घेत मतदारसंघातील घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. यासह दीड वर्षापूर्वीच प्रवीण घुले देखील भाजपात आल्याने महायुतीचे ताकद निश्चित वाढली आहे.
अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार
पवार आणि शिंदेंची वर्चस्वाची लढाई (Karjat Jamkhed Constituency)
आमदार रोहित पवार यांनी आपल्या पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळातील विकासकामाने मतदारांच्या समोर जात आहेत. रोहित पवार हे शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आणि मित्रपक्षांची मोट बांधून विधानसभेच्या राजकीय रणांगणात पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे जाहीर भाषणात सांगत आहे. त्यांचा आणि आमदार राम शिंदेच्या संघर्षात कर्जत-जामखेडचा स्वाभिमान म्हणून नवीन टॅगलाईन घेत चार हात करण्यास सज्ज असल्याचे दिसते. तर दुसरीकडे राम शिंदे विधान परिषदेतून आणखी चार वर्षे आमदार राहणार आहेत. मात्र, ते कर्जत-जामखेड मतदारसंघावरचा दावा सोडण्यास तयार नाहीत. लढत पवार आणि शिंदे होईल आणि त्यात भूमिपुत्र म्हणून आपण बाजी मारून आपला राहिलेला आमदारकीचा सत्कार रोहित पवारांकडून करवून घेत ती सावड यंदा फेडायची असे ठणकावून सांगत आहेत. दुसरीकडे जय पवार यांनी मतदारसंघात स्थानिक नेत्यांची भेट घेत आपल्या गटाकडून स्वत: अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार चाचपणी करीत असल्याने सर्वांच्या नजरा आपल्याकडे केंद्रित केल्या आहे.
२०१९ ला आमदार रोहित पवारांनी ४३ हजार ३४७ मतांनी राम शिंदेंचा पराभव करीत कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपाकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतला होता. या निवडणुकीत रोहित पवारांना १ लाख ३५ हजार ८२४ तर राम शिंदेंना ९२ हजार ४७७ मते पडली होती. मात्र, झालेल्या लोकसभेत खासदार निलेश लंकेना याच मतदारसंघातून अवघे ९ हजार १२८ मतांचे मताधिक्य होते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात चुरशीची लढत पाहवयास मिळू शकते. कर्जत-जामखेड मतदारसंघात अंबालिका साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांचे मतदारसंघात वर्चस्व आहे, हे देखील विसरून चालणार नाही.
डॉ. अफरोजखान पठाण