Kash Patel sworn : भारतीयांचा महत्वाचा धर्मग्रंथ असलेल्या भगवद् गीतेला (Bhagavad Gita) जगभरात अनन्यसाधारण महत्व आहे. याचंच एक उदाहरण पुन्हा अमेरिकेत पाहायला मिळाले आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक काश पटेल (Kash Patel) यांनी फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयचे नववे संचालक म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी भगवद् गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.
नक्की वाचा : १९४७ ला १ रुपयात मिळणाऱ्या वस्तू आता किती रुपयात मिळतात?
वॉश्गिंटन येथील व्हाईट हाऊस संकुलातील इंडियन ट्रीटी दालनात अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या देखरेखीखाली हा शपथविधी सोहळा पार पडला. एफबीआय संचालक म्हणून काश पटेल यांचा कार्यकाळ हा १० वर्षांचा असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा दिला होता.आता त्यांची जागा काश पटेल यांनी घेतली आहे.
अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांचे केले कौतुक (Kash Patel sworn)

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांचे याआधी कौतुक केले होते. एफबीआय एजन्ट्सकडून त्यांना पाठिंबा मिळाला असल्याचेही ट्रम्प म्हणाले. “काश पटेल मला आवडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सर्व एजंट्सना त्याच्याप्रती असलेला आदर”. पटेल आतापर्यंतचे सर्वोत्तम संचालक म्हणून ओळखले जातील. तो एक अतिशय मेहनती आणि कणखर व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे. त्याच्या स्वतःच्या भूमिका आहेत, असं त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या संसदेने गुरूवारी (ता.२०) काश पटेल यांच्या नियुक्तीला ५१ –४९ मतांनी हिरवा झेंडा दाखविला होता.रिपब्लिकन पक्षाचे खासदार सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी काश पटेल यांच्या नियुक्तीला विरोध करत डेमोक्रॅटिक पक्षाची साथ दिली. त्यामुळे ५१ मतांनी त्यांची निवड झाली.
काश पटेल नेमके कोण ? (Kash Patel sworn)
काश पटेल यांचे भारताशी जवळचे नाते राहिले आहे. त्यांचे आई-वडील हे गुजरातहून न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटी येथे स्थायिक झाले होते. दोघे आधी कॅनडा येथे राहिले. नंतर १९७० मध्ये अमेरिकेत गेले. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या पटेल यांनी आपली गुजराती ओळख कायम अभिमानाने जाहीर केली आहे. काश पटेल यांनी रिचमंड विद्यापीठ आणि पेस यूनीव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ येथून कायद्याची पदवी घेतली आहे. पटेल यांनी २०१७ मध्ये तात्कालीन ट्रम्प प्रशासनात शेवटचे काही दिवस चीफ ऑफ स्टाफ म्हणून देखील काम केले होते.