Kharif Season | नगर : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये (Kharif Season) शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वितरण करण्यात यावे. खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेत काळाबाजार, साठेबाजी व अनियमितता रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४२ अर्ज दाखल
कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित (Kharif Season)
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा नियोजन व वितरण व्यवस्थापन समिती’च्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले… (Kharif Season)
जिल्हाधिकारी डॉ. आशिया पुढे म्हणाले की, जिल्ह्यात खतांची टंचाई निर्माण होणार नाही, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना खतांचे समान वितरण होईल यादृष्टीने सुयोग्य नियोजन करण्यात यावे. खतांची जादा दराने विक्री, खतांचे लिंकिंग असे गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीत जिल्ह्यातील खत साठ्याची सद्यस्थिती, मागणी, मंजूर आवंटन आणि संरक्षित (बफर) साठा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या जिल्ह्यात १९ हजार ६७४ मेट्रिक टन युरिया, ८ हजार ७४३ मेट्रिक टन डीएपी, ४ हजार ८३६ मेट्रिक टन एमओपी, ८८ हजार ६९१ मेट्रिक टन संयुक्त खते तसेच २५ हजार ६३३ मेट्रिक टन एसएसपी असा एकूण १ लाख ४७ हजार ६३५ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. तसेच आगामी हंगामासाठी एकूण ७ हजार ९०० मेट्रिक टन युरिया व ८५० मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित (बफर) साठा ठेवण्यात आला आहे.
तालुकानिहाय युरिया बफर साठ्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार नगर – ५१३ मेट्रिक टन, पारनेर – ५३७, पाथर्डी – ५५८, जामखेड – ५२६, श्रीगोंदा – ५७१, कर्जत – ५५८, श्रीरामपूर – ४९५, राहुरी – ४८६, नेवासा – ५९६, शेवगाव – ५९६, संगमनेर – ६६०, अकोले – ७७७, कोपरगाव – ५२८ व राहाता – ४५० मेट्रिक टन असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.



