Khashaba Jadhav : खाशाबा जाधवांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’म्हणून साजरा होणार

Khashaba Jadhav : ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी दरवर्षी 'राज्याचा क्रीडा दिन'म्हणून साजरा केला जाणार आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

0
Khashaba jadhav

नगर : ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा जन्मदिन १५ जानेवारी दरवर्षी ‘राज्याचा क्रीडा दिन'(State Sports Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने (State Government) मान्यता दिली आहे. तसेच, क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये (Grant) वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा शासनानं निर्णय घेतला आहे. यासंदर्भात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी माहिती दिली आहे.

नक्की वाचा : भंडारदरा परिसर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज

क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव वाढवणाऱ्या कामगिरीस सातत्यानं उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान आणि नव्या खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, यासाठी त्यांचा जन्मदिन राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून दरवर्षी संपूर्ण राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपूर तालुक्याचे अतिवृष्टीचे साडेपाच कोटीचे अनुदान वर्ग

राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला यापूर्वी १० हजार अनुदान देण्यात येत होतं. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्याला राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनास ५० हजार तर क्रिडा सप्ताहाला १ लाख रुपये,असे एकूण २ लाख २५ हजार सुधारीत अनुदान देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी (ता.२९) काढण्यात आला आहे.

क्रीडा प्रेमीसांठी ही आनंदाची बाब असल्याचं मंत्री बनसोडे यांनी सांगितलं. तसेच, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात भरीव अनुदान उपलब्ध करुन दिलं, त्यामुळे मंत्री बनसोडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here