Kidnapping : श्रीरामपूर : कामोठे, नवी मुंबई (Navi Mumbai) येथून अपहरण (Kidnapping) केलेल्या एका बालकाची तांत्रिक माहितीच्या आधारे येथील पोलिसांनी (Police) नुकतीच सुखरुप सुटका केली. अपहरण झाल्यानतंर अवघ्या आठ तासाच्या आत त्या बालकाची सुखरुप सुटका करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेसह (Local Crime Branch) श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पकडून नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नक्की वाचा : चोराचा शोध घेण्यासाठी बस थेट पोलीस ठाण्यात
७ वर्ष वयाच्या बालकाचे अज्ञात इसमांकडून अपहरण
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (ता.२६) सकाळी ८ वाजेच्या सुमारास मोरे हॉस्पीटल पाठीमागील मैदान, मोठाखांदा कामोठे (ता. पनवेल, नवी मुंबई) येथून सात वर्ष वयाच्या एका बालकाचे काही अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाकरीता फुस लावून पळवून नेल्याबाबत बालकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन कामोठे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने नमुद बालकाचा शोधाकरीता नवी मुंबई पोलिसांकडून सर्व महाराष्ट्रातील पोलीस नियंत्रण कक्षांना कळविले होते. नमुद अपहृत बालक यास घेवून अपहरणकर्ते हे अहिल्यानगर जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता असल्याबाबत पोलीस अधीक्षक यांना पनवेल, नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी कळविले होते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात अपहृत बालकाचा व अपहरणकर्ते यांचा शोध घेण्याबाबत पोलीस अधिक्षक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले होते.
अवश्य वाचा : भारतातील अर्थक्रांतीचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
नाकाबंदी व पाठलाग करुन अपहृत बालकाची केली सुटका (Kidnapping)
दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्ते हे संगमनेर रोडने नेवासेच्या दिशेने जात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नाकाबंदी तसेच पाठलाग करुन अपहरणकर्ते हे अपहृत बालकास घेवून जात असलेले वाहन टाकळीभान येथे अडवून त्यातील अपहृत बालकाची सुखरुप सुटका केली. तसेच सदर बालकास फुस लावून घेवून जात असलेले विलास रामु इंगळे, अक्षय आबासाहेब म्हस्के, बाबासाहेब चिनप्पा पोळमाळी, कैलास रामू इंगळे, प्रसाद गंगाधर कुटे (सर्व रा. कुकाणा, ता. नेवासा) यांना ताब्यात घेवून त्यांना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस शिपाई संभाजी खरात, रामेश्वर तारडे, अजित पटारे, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक दरंदले, पोलीस शिपाई शिरसाठ, ससाणे तसेच अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस शिपाई रामेश्वर वेताळ यांनी केली आहे.